नाममहिमा - अभंग ११६२ ते ११८०
११६२
ऐका नामाचें महिमान । नाम पावन तें जाण ॥१॥
हास्य विनोंदें घेतां नाम । तरती जन ते अधम ॥२॥
एका जनार्दनीं धरीं विश्वास । नामें नासती दोष कळिकाळाचे ॥३॥
११६३
नामाचें महिमान सादर ऐका । तारियेले देखा महापापी ॥१॥
पापाची ते राशी अजामेळ जाण । जपतांचि पावन नामें जाहला ॥२॥
गणिका पांखिरूं नाम जपे सदा । नोहे तिसी बाधा गर्भवासा ॥३॥
एका जनार्दनीं कलीमाजीं नाम । उत्तम उत्तम जपा आधीं ॥४॥
११६४
दोषी पापराशी नामाचे धारक । होतां तिन्हीं लोक वंदिती माथां ॥१॥
नामाचें महिमान नामांचे महिमान । नामाचे महिमान शिव जाणे ॥२॥
जाणती ते ज्ञानी दत्त कपिल मुनी । शुकादिक जनींधन्य जाहलें ॥३॥
एका जनार्दनीं नाम परिपुर्ण । सांपडली खुण गुरुकृपें ॥४॥
११६५
नाम पवित्र आणि परिकर । नामें तरले दोषी अपार । नामें हेंचि निजसार । आधार वेदशास्त्रांचे ॥१॥
तारक कलिमाजीं नाम । भोळ्याभाविकां सुगम । ज्ञाते पंडित सकाम । नामें तरती श्रीहरींच्या ॥२॥
मनीं माझ्या ऐक गोष्टी । नाम जपेंतुं सदा कंठीं । एका जनार्दनीं परिपाठीं । नाहीं गोष्टीं दुसरी ॥३॥
११६६
नाम तें उत्तम नाम तें सगुण । नाम तें निर्गुण सनातन ॥१॥
नाम तें ध्यान नाम तें धारणा । नाम तें हेंजना तारक नाम ॥२॥
नाम तें पावन नाम तं कारण । नामापरतें साधन आन नाहीं ॥३॥
नाम ध्यानीं मनीं गातसें वदनीं । एका जनार्दनीं श्रेष्ठ नाम ॥४॥
११६७
नामाचा धारक । हरिहरां त्याचा धाक ॥१॥
ऐसें नाम समर्थ । त्रिभुवनीं तें विख्यात ॥२॥
नामें यज्ञयाम घडती । नामें उत्तम लोकी गती ॥३॥
नामें भुक्ति मुक्ति तिष्ठें । नामें वरिष्ठा वरिष्ठें ॥४॥
नामें सर्व सत्ता हातीं । नामें वैकुंठीं वसती ॥५॥
नामें होती चतुर्भूज । एका जनार्दनीं सतेज ॥६॥
११६८
अष्टादश पुराणें सांगती बडिवार । नाम सारांचें सार कलियुगीं ॥१॥
तारिले पातकी विश्र्वास घातकी । मुक्त झाले लोकीं तिहीं सत्य ॥२॥
सर्वांतर सार नामजपु निका । जनार्दनाचा एका घोकितसें ॥३॥
११६९
सका साधनांचें सार । मुखी नामाचा उच्चार ॥१॥
सकळ तपांचे जें सार । मुखीं नामाचा उच्चार ॥२॥
सकळ ज्ञानाचें जें सार । मुखी नामाचा उच्चार ॥३॥
सकळ ब्रह्मा विद्येंचें जे घर । एका जनार्दनींचें माहेर ॥४॥
११७०
साधन सोपें नाम वाचे । पर्वत भंगती पापाचें । विश्वासितातें साचे । नाम तारक कलियुगी ॥१॥
अहोरात्र वदता वाणी । ऐसा छंद ज्याचे मनीं । त्याचेनि धन्य ही मेदिनी । तारक तो सर्वांसी ॥२॥
एका जनार्दनीं नाम । भाविकंचें पुरे काम । अभागियांतें वर्म । नव्हे नव्हे सोपारें ॥३॥
११७१
पशु पक्षी वनचरें । श्वान श्वापदादि सुकरें ॥१॥
पडतां नाम घोष कानीं । पावन होती इयें जनीं ॥२॥
चतुष्पाद आणि तरुवर । नामें उद्धार सर्वांसी ॥३॥
उंच नीच नको याती । ब्राह्मणादी सर्व तरती ॥४॥
एका जनार्दनीं अभेद । नामीं नाहीं भेदाभेद ॥५॥
११७२
नामामृत पुढे । कायसें अमृत बापुडें ॥१॥
ऐसा नामाचा बडिवार । गोडी जाणे गिरिजावर ॥२॥
नामें जोडें ब्रह्माज्ञान । भुक्ति मुक्ति नामें जाण ॥३॥
एका जनार्दनीं सार । ब्रह्माज्ञानाचें हें घर ॥४॥
११७३
नाम पावन तिही लोकीं । मुक्त झालें महा पातकी ॥१॥
नाम श्रेष्ठांचें हें श्रेष्ठ । नाम जपे तो वरिष्ठ ॥२॥
नाम जपे नीलकंठ । वंदिताती श्रेष्ठ श्रेष्ठ ॥३॥
नाम जपे हनुमंत । तेणे अंगीं शक्तिवंत ॥४॥
नाम जपे पुंडलीक । उभा वैकुंठनायक ॥५॥
नाम ध्यानीं मनीं देखा । जपे जनार्दनीं एका ॥६॥
११७४
तारले नामे अपार जन । ऐसें महिमान नामाचें ॥१॥
अधम तरले नवल काय । पाषाण ते पाहें तरियेले ॥२॥
दैत्यदानव ते राक्षस । नामें सर्वांस मुक्तिपद ॥३॥
एका जनार्दनीं नाम सार । जपा निरंतर हृदयीं ॥४॥
११७५
नामें पावन हीन याती । नाम जपती अहोरात्रीं । नामापरती विश्रांती । दुजी नाहीं प्राणियां ॥१॥
नका भ्रमुं सैरावैरा । वाउगे तप साधन पसारा । योग याग अवधारा । नामें एका साधतसे ॥२॥
व्रत तप हवन दान । नामें घडे तीर्थ स्नान । एका जनार्दनीं मन । स्थिर करुनि नाम जपा ॥३॥
११७६
अनामिकादि चांडाळ । नामें सकळ तारिले ॥१॥
ब्रह्माहत्या पापराशी । नामें वैकुंठवासी पावले ॥२॥
दुराचारी व्याभिचारी । गणिकानारी तारिली ॥३॥
एका जनार्दनीं नाम । मंगळधाम मंगला ॥४॥
११७७
नाम तारक ये मेदिनी । नाम सर्वांचे मुगुटमणी । नाम जपे शुळपाणी । अहोरात्र सर्वदा ॥१॥
तें हें सुलभ सोपारें । कामक्रोध येणें सरे । मोह मद मत्सर । नुरे नाममात्रें त्रिजगतीं ॥२॥
घेउनी नामाचें अमृत । एका जनार्दनीं झाला तृप्त । म्हणोनि सर्वांते सांगत । नाम वाचे वदावें ॥३॥
११७८
नाम तारक हें क्षितीं । तरलें आणि पुढे तरती ॥१॥
न लगे साधन मंडण । नामें सर्व पापदहन ॥२॥
योगयागांची परवडी । नामापुढें वायां गोडी ॥३॥
नाम वाचे आवडी घोका । म्हणे जनार्दनीं एका ॥४॥
११७९
नाम पावन पावन । नाम दोषांसि दहन । नाम पतीतपावन । कलीमाजीं उद्धार ॥१॥
गातां नित्य हरिकथा । पावन होय श्रोता वक्ता । नाम गाऊनि टाळी वाहतां । नित्य मुक्त प्राणी तो ॥२॥
एका जनार्दनीं नाम । भवसिंधु तारक नाम । सोपें सुगम वर्म । भाविकांसी निर्धारें ॥३॥
११८०
नाम गाये तो सर्वत्र क्षितीं । नामें उद्धार त्रिजगतीं ॥१॥
ज्यांचे उच्चारितां नाम । निवारे क्रोध आणि काम ॥२॥
वेदशास्त्र विवेकीसंपन्न । नामें होताती पावन ॥३॥
नामें उत्तम अधमा गती । एका जनार्दनीं ध्यान चिंत्ती ॥४॥