विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ४९०
पुंडलिक भक्तिसामर्थ्य
४८०
द्वारकेहुनी जगजेठी । आला पुंडलिकाचे भेटी । पाऊलें सरळ गोमटी । बाळ सुर्यापरी ॥१॥
धन्य धन्य पांडुरंग । मुर्ति सावळी सवेग । गाई गोप संवगडे लाग । मिळोनि सकळांसहित ॥२॥
पाहतां पुंडलिकांचें वदन । वेडावलें भक्तांचे भुषण । केलेंसे खेवण । समचरणीं विटेवरीं ॥३॥
न बैसे अद्यापि खालीं । ऐशी कॄपेची माउली । एका जनार्दनीं आली । भक्तिकाजा विठ्ठल ॥४॥
पुंडलिकाची जगदोद्धरार्थ विनवणी
४८१
जोडोनिया हात दोन्हीं । पुंडलीक मुनी विनवीत ॥१॥
आम्हा तैसें उगेचि रहा । माझिये पहा प्रेमासी ॥२॥
जे जे येती ज्या ज्या भावें । ते ते तारावें कृपाळुवा ॥३॥
एका शरण जनार्दनीं । ब्राह्मा पसरुनि हरी बोलें ॥४॥
आजगदोद्धारार्थ श्रीकृष्नांनें दिलेला वर
४८२
धन्य धन्य पुंडलिक । तारिले लोकां सकळां ॥१॥
तुझें भाकेंगुतुंनी येथें । तारीन पतीत युगायुगीं ॥२॥
भाळे भाळे येतील जैसे । दरुशनें ते तैसे वैकुंठीं ॥३॥
एका जनार्दनीं देऊनी वर । राहें विटेवर मग उभा ॥४॥
४८३
निकट सेवे धांऊनि आला । पृष्ठी राहिला उभाची ॥१॥
ऐसा क्षीरसिंधुवासी । भक्तापाशीं तिष्ठत ॥२॥
नाहीं मर्यादा उल्लंघन । समचरण विटेवरी ॥३॥
एका जनार्दनीं गोजिरें ठाण । धरुनी जघन उभा हरी ॥४॥
४८४
भक्ताद्वारीं उभाचि तिष्ठे । न बोले न बैसे खालुता ॥१॥
युगें जाहलीं अठ्ठावीस । धरुनी आस उभाची ॥२॥
जड मुढ हीन दीन । तारी दरुशनें एकाची ॥३॥
एका जनार्दनीं ऐसा वर । दिधला साचार भक्तांसी ॥४॥
४८५
एकरुप मन जालेंसे दोघांचें । देव आणि भक्तांचे रुप एका ॥१॥
पुंडलिकाकारणें समुच्चय उभा । त्रैलोक्याची शोभा पांडुरंग ॥२॥
ध्याता चित्त निवे पाहतां ठसावें । एका जनार्दनीं सांठवें हृदयीं रुपे ॥३॥
४८६
घेऊनियां परिवारा । आला असे पंढरपुरा ॥१॥
भक्तां पुंडलिकासाठी । उभा ठेवुनी कर कटीं ॥२॥
केशर कस्तुरी चंदन टिळा । कांसे शोभें सोनसळा ॥३॥
वामांकी शोभे रुक्मिणी । शरण एका जनार्दनीं ॥४॥
४८७
आवडीच्या सुखा सुखावला । वैकुंठ सांडोनी पंढरीये आला ॥१॥
देखोनियां पुंडलीका । उभा सम पाई देखा ॥२॥
न बैसे खालीं । युगें अठ्ठावीस जालीं ॥३॥
ऐशी भक्तांची माउली । उभी तिष्ठत राहिली ॥४॥
एका जनार्दनीं देव । उभा राहिला स्वयमेव ॥५॥
४८८
ऐशी आवडी मीनली सुखा । देव उभा भक्तद्वारीं देखा ॥१॥
धन्य धन्य पुंडलीका । उभे केलें वैकुंठनायका ॥२॥
युगें अठ्ठावीस नीत । उभा विते कर धारुनियां कट ॥३॥
एका जनार्दनीं शरण जाऊं । काया वाचा मनें त्यासी ध्याऊं ॥४॥
४८९
विठ्ठल रुक्मिणी राहीं सत्यभामा एकरुपी परमात्मा पंढरीये ॥१॥
कैवल्य उघडें क्षीरसागर निवासी । तपें पुंडलिकासे वश्य जाहिलें ॥२॥
अणूरेणुपासोनि भरुनि उरला । तो म्यां देखियेला पंढरीये ॥३॥
एका जनार्दनीं सांवळा श्रीकृष्ण । जनीं जनार्दनीं पुर्ण भरला ॥४॥
४९०
कैसा पुंडलिका उभा केला । वैकुंठाहुनी भक्ति चाळविला ॥१॥
नेणें रे कैसें वोळलें । अधीन केलें आपुलिया ॥२॥
दर्शनमात्रें प्राणियां उद्धार । ऐशी कीर्ति चराचर ॥३॥
एका जनार्दनीं म्हणे पुंडलिक । भक्त शिरोमणि तुंचि देखा ॥४॥