नामपाठफल - अभंग १२८२ ते १३२३
१२८२
नामपाठ सदा एकांती जो करी । भुक्तिमुक्ती चारी घरीं त्याच्या ॥१॥
न लगे साधन व्युप्तत्ति पसारा । नामपाठ बरा संतसंगे ॥२॥
जनार्दनाचा एका नामपाठें निका । तारिले जडलोकां नामपाठें ॥३॥
१२८३
नामपाठ अंडज जारज स्वेदज । उद्भिज देख चार योनी ॥१॥
नामपाठ प्रेमें गाय तूं आवडीं । तुटेल सांकडीं कर्म धर्म ॥२॥
जनार्दनाचा एक नामपाठीं निका । तोडियेली शाखा द्वैताची ते ॥३॥
१२८४
नामपाठ जया नाही पैं सर्वथा । तयासी तत्त्वतां यमदंड ॥१॥
मारिती तोडिती यमाचे ते दूत । नामपाठीं चित्त कां रें नेणें ॥२॥
जनार्दनाचा एका सांगे सर्व लोकां । नामपाठ घोका आळस नका ॥३॥
१२८५
नामपाठ वर्म सोपें आहे जाणा । चिंती नारायणा नामपाठें ॥१॥
अष्टांग योग साधनें वरिष्ठ । नामपाठेंविण कष्ट होतीं जना ॥२॥
जनार्दनाचा एका करी विनवणी । नामपाठ निर्वाणीं शस्त्र आहे ॥३॥
१२८६
नामपाठ युक्ति जगीं सोपी जाणा । म्हणोनि नारायण आठवावें ॥१॥
नामपाठ सोपा नामपाठ सोपा । जन्ममरण खेपा दुर होती ॥२॥
जनार्दनाचा एका आवडीनें गाये । नाशिवंत पाहें शरीर आहे ॥३॥
१२८७
नामपाठ गाये धन्य तो संसारीं । काय त्याची थोरी वानूं जगीं ॥१॥
तयाचे चरणीं माझा दंडवत । नामपाठ गात सर्वभावें ॥२॥
जनार्दनाचा एका नामपाठ भावें । अखंड गात आहे जीवेंभावें ॥३॥
१२८८
नामपाठ गाय सदा नामपाठ गाय । धन्य त्याची माय त्रिभुवनीं ॥१॥
ब्रह्मादिक वंदिती शिवादिक ध्याती । नामपाठ कीर्ति मुखीं गातां ॥२॥
एका जनार्दनीं साराचें हें सार । नामपाठ निर्धार केला जगीं ॥३॥
१२८९
नामपाठ सत्ता सर्वां वरिष्ठाता । यमधर्म माथां वंदी पाय ॥१॥
ऐसा नामपाठ भक्तियुक्त गाय । पुनरपि नये संसारासी ॥२॥
जनार्दनाचा एका सांगतसे फुका । नामपाठ घोका जीवेंभावें ॥३॥
१२९०
नामपाठ जागीं सोपें तें साधन । म्हणोनि वर्णन वैष्णव करिती ॥१॥
आनंदे नाचती टाळी वाजविती । नामपाठ गाती सर्वभावें ॥२॥
जनार्दनाचा एक भुलला नामपाठीं । म्हणोनि वैकुंठी घर केलें ॥३॥
१२९१
नामपाठ सोपा हरावया पापें । आणीक संकल्प न करी दुजा ॥१॥
नामपाठें सिद्धि नामपाठें सिद्धि । तुटेल उपाधी नामपाठें ॥२॥
जनार्दनाचा एक गात नाचत । नामपाठ करीत सर्वकाळ ॥३॥
१२९२
नामपाठ करितां काळ वेळ नाहीं । उच्चारुनी पाहीं सर्वकाळ ॥१॥
सर्वभावें नामपाठ तूं गाये । आणिक न करी काय साधन तें ॥२॥
जनार्दनाचा एक भुलता नामपाठीं । आणिक न करी गोष्टी नामविण ॥३॥
१२९३
नामपाठ सोपा भोळ्या भाविकांसी । मत वादीयांसी न रुचे नाम ॥१॥
नवज्वरिता दुग्ध प्राण जाय तत्त्वतां । अभाविकांसी सर्वथा गति तेंची ॥२॥
जनार्दनाचा एक सांगे प्रेमभावें । आदरें तें गावें नामपाठ ॥३॥
१२९४
गाय नामपाठ न करीं आळस । हातां येईल सौरस इच्छिलें तें ॥१॥
न करी आळस आलिया संसारीं । नामपाठ निरंतरीं गाय सदा ॥२॥
जनार्दनाचा एक प्रेमें विनटला । नामपाठें झाला कृतकृत्य ॥३॥
१२९५
नामपाठ करितां जाईल पैं चिंता । मोक्ष सायुज्यता हातां येई ॥१॥
म्हणोनि सोपें वर्म सांगतसे तुज । नामपाठ गुज जपें सदा ॥२॥
जनार्दनाचा एक कुर्वंडी करुनी । लोळत चरणीं संताचिया ॥३॥
१२९६
नामपाठें होय शुद्ध तें शरीर । आणिक विचार न करी कांहीं ॥१॥
नामपाठ भोळे नामपाठ भोळे । शंकर तो लोळे स्मशानीं तो ॥२॥
जनार्दनाचा एका प्रचीत घेउनी । नामपाठ वचनी जपतसे ॥३॥
१२९७
नामपाठ जपे भोळा महादेव । देवाधि देव वंदी तया ॥१॥
विष तें अमृत नामपाठें झाले । दैन्य दुःख गेलें नाम जपतां ॥२॥
जनार्दनाचा एका उभारुनि बाह्या । नामपाठ गाय सर्वकाळ ॥३॥
१२९८
शास्त्रवेत्ते ज्ञानी नामपाठ गाती । तेणें तयां विश्रांती सर्वकाळ ॥१॥
पुराणें वदती नाम पाठ कीर्ती । व्यासादिकीं निश्चितीं नेम केला ॥२॥
जनार्दनाचा एका सांगतसे गुज । नामपाठ निज जपे जना ॥३॥
नामापाठफल प्राप्त झालेले भक्त
१२९९
नामपाठें गणिका नेली मोक्षपदा । नामपाठें प्रल्हादा सुख झालें ॥१॥
नामपाठें ध्रुव अढळपदीं बैसें । नारद नाचतसे नामपाठे ॥२॥
जनार्दनाचा एक सांगे अनुभव । नामपाठ सर्व जपा आधी ॥३॥
१३००
नामपाठे भक्ति हनुमंतें केली । सेवा रुजू झाली देवा तेणें ॥१॥
नामपाठें शक्ति अद्भुत ये अंगी । धन्य झाला जगीं कपीनाथ ॥२॥
जनार्दनाचा एका सेवोनि आदरें । नामपाठ स्मरे सर्व काळ ॥३॥
१३०१
नामपाठें नक्र तारिला निर्धारें । गजेंद्र उद्धरे नामपाठे ॥१॥
तरले तरले नामेंचि तरले । वैकुंठासी नेले नामपाठें ॥२॥
जनार्दनाचा एका जोडोनियां हात । नामपाठ गात संतापुढे ॥३॥
१३०२
नामपाठें नक्र तारिला निर्धारें । गर्जेंद्र उद्धरें नामपाठें ॥१॥
तरले तरले नामेंचि तरले । वैकुंठासी नेले नामपाठें ॥२॥
जनार्दनाचा एका जोडोनियां हात । नामपाठ गात संतापुढें ॥३॥
१३०३
नामपाठें तारिलें पतित उद्धरिले । धांवणे तें केलें पांडवांचें ॥१॥
पडतां सकंटीं नामपाठ गाय । द्रौपदींती माय तारियेली ॥२॥
जनार्दनाचा एक सांगतसे लोकां । नामपाठ फुका जपा आधीं ॥३॥
१३०४
नामपाठें सर्व मुक्तत्त्व साधिती । नामपाठें विरक्ति हातां येत ॥१॥
नामपाठें उद्धव तरला तरला । नामपाठें झाला शापमुक्त ॥२॥
जनार्दनाचा एका बोले लडिवाळ । नामपाठ काळ काळाचाही ॥३॥
१३०५
नामपाठें अक्रुर सर्व ब्रह्मारुप । भेदाभेद संकल्प मावळले ॥१॥
वंदी रजमाथां घाली लोटांगण । द्वैतांचे बंधन तुटोनी गेलें ॥२॥
जनार्दनाचा एका नामपाठें मुक्त । जालासे सतत संतचरणीं ॥३॥
१३०६
नामपाठें बिभीषण सर्वांस वरिष्ठ । वंश तो स्पष्ट देशोधडी ॥१॥
जाउनी शरण चिरंजीव झाला । नामपाठें धाला कल्पवरी ॥२॥
जनार्दनाचा एक मिरवी बडिवार । नामपाठ सार युगायुगीं ॥३॥
१३०७
नामपाठें भीष्में कामातें जिंकीलें । सार्थक पैं केलें विहिताचें ॥१॥
आदरें आवडी नामपाठ गावें । सर्वावरी होय सत्ता त्याची ॥२॥
जनार्दनाचा एक होउनी शरण । घाली लोटांगण संतचरणीं ॥३॥
१३०८
नामपाठें तरला चोखा तो महार । भावें सर्वेश्वर स्थापीं तया ॥१॥
नामपाठ करुनि कीर्ति केली जगीं । उपमा तें अंगीं वाढविली ॥२॥
जनार्दनाचा एक वर्णितो संतांसी । नित्य नामपाठासी अनुसरला ॥३॥
१३०९
नामपाठें गोरा कुंभार तरला । उद्धार तो झाला पूर्वजांचा ॥१॥
नामपाठ कीर्ति गाताती वैष्णव । धन्य तो अपूर्व नाममहिमा ॥२॥
जनार्दनाचा एका चरणरजरेण । नामपाठ संकीर्तन करा वेगीं ॥३॥
१३१०
नामपाठ प्रेमें सांवता तो गाये । हृदयकमळी वाहे नारायण ॥१॥
नामपाठ निका नामपाठ निका । खुर्पु लागे देखा देव त्यासी ॥२॥
जनार्दनाचा एका ऐकोनियां बोल । सांगत नवल संतापुढें ॥३॥
१३११
नामपाठें नामा शिंपी तो तरला तयाची देवाला आवड मोठी ॥१॥
जाऊनी जेवणें उच्छिष्ठ भक्षणें । नामपाठें देणें इच्छिलें तें ॥२॥
जनार्दनाचा एक सद्गदित होय । नामपाठ गाय आवडीनें ॥३॥
१३१२
नामपाठें जनाबाई बरोबरी । दळी कांडी हरि शेणी वेंची ॥१॥
भक्तांचे सकळ कार्य तें करणें । नये ऐसें उणें करी काम ॥२॥
जनार्दनाचा एक आवड पाहुनी । नाचतो कीर्तनीं नाम गाय ॥३॥
१३१३
नामपाठें आपण होय अनामिक । नामपाठें देख न म्हणे कांहीं ॥१॥
उंच नीच ज्ञाती न करी विचार । नामपाठें निर्धार ऐसा ज्याचा ॥२॥
जनार्दनाचा एका सर्वभावे देखा । नामपाठ निका गात असे ॥३॥
१३१४
नामपाठें ज्ञानियाची भिंत ओढी । भाविका तांतडी देव धांवे ॥१॥
बोलविला रेडा केलेंस कवित्व । नामपाठे मुक्त केलें जन ॥२॥
जनार्दनाचा एका लागतो चरणीं । जावे ओवाळीनी जन्मोजन्मीं ॥३॥
१३१५
नामपाठें सोपान समबुद्धि झाला । विश्रांती पावला संवत्सरीं ॥१॥
मुख्य ब्रह्मा तो नामपठ वंदी । इतर तरणे उपाधीपासोनियां ॥२॥
जनार्दनाचा एका कांही नेणें देखा । नामपाठें सुखा सुख झालें ॥३॥
१३१६
नामपाठें मुक्त मुक्ताई पैं झाली । हृदयीं आटली नामपाठें ॥१॥
देहादेहे सर्व निरसिले चार्हीं । नामपाठ वरी मुक्त झाले ॥२॥
जनार्दनाचा एका बोले करुणावचनीं । नामपाठ झणीं विसरुं नका ॥३॥
१३१७
नामपाठें निवृत्ति पावला विश्रांती । नामपाठें शांति कर्माकर्मीं ॥१॥
म्हणोनि प्रेमभावें नामपाठ गावें । आलिंगन द्यावें संतचरण ॥२॥
जनार्दनाचा एका चिंता नामपाठ । मोक्षमार्ग वाट सोपा जगा ॥३॥
१३१८
नामपाठ मच्छिद्र गोरक्षातें बोधी । तोडिली उपाधी चौदेहांची ॥१॥
नामपाठ मोक्ष मार्ग तो सर्वदा । वाचे गातां बाधा नोहे कांहीं ॥२॥
जनार्दनाचा एका द्वैताविरहित । नामपाठ गात सर्वभावें ॥३॥
१३१९
नामपाठें गोरक्ष वोळगला गहिनी । दाविली उन्मनी सर्वकाळ ॥१॥
समाधि आसन सैरा ते बोल । नामपाठ मोल अभ्यासिलें ॥२॥
जनार्दनाचा एका नेणें तो उन्मनी । सदा संतचरणीं मिठी घाली ॥३॥
१३२०
नामपाठें गहिनी निवृत्ति वोळला । उघड तो केला परब्रह्मा ॥१॥
नामपाठ ब्रह्मा नामपाठ ब्रह्मा । आणिक नेणें कर्म वर्म नामेंविण ॥२॥
जनार्दनाचा एका सेवेसी नटला । नामपाठें केला जनार्दन ॥३॥
१३२१
नामपाठें निवृत्ति ज्ञानदेवा उपदेशी । ओहं सोहं कोहं साक्षी केले ॥१॥
तिन्हीपरता बोध तयासी बोधिला । नामपाठें झाला शांतरुप ॥२॥
जनार्दनाचा एक गमोनी मनासी । लागतो चरणांसी जनार्दना ॥३॥
१३२२
नामपाठें गुण झाले पैं त्रिगुण । अनाम लक्षण नामपाठें ॥१॥
सैरा सैराट धांवे जे वाटा । तयाच्या चेष्टा न चलती तेथें ॥२॥
जनार्दनाचा एका एकपणें बोधिला । जनार्दन वोळला कामधेनु ॥३॥
१३२३
नामपाठें क्रिया नामपाठें कर्म । नामपाठें वर्म हातां येत ॥१॥
तो हा सोपा योग नामपाठ वाचे । न करी सायासांचे वर्म कांहीं ॥२॥
जनार्दनाचा एका भक्तीसी भुलला । मोकळा मार्ग केला नामपाठें ॥३॥
नामपाठमार्ग-गीताज्ञानेश्वरीपाठ व एकाग्र मनानें अखंड नामोच्चार