रामनाममहिमा - अभंग ७७१ ते ७८०
७७१
व्यासादिका गाती ज्यासी । शुक सांगे परीक्षितीसी ।
श्रीकृष्ण उपदेशी उद्धवासी । नाम सार कलींत ॥१॥
तोचि वेध बैसला मना । ध्यानीं मनीं रामराणा ।
नाहीं दुजी उपासना । नामापरते साधन ॥२॥
वेदशास्त्र पुराणें । नामापरतें नाहीं घेणें ।
एका जनार्दनीं म्हणे । नाम उत्तम चांगलें ॥३॥
७७२
रामनामें तारिलें । पशु पक्षी उद्धरिले ॥१॥
ऐसे रामनाम बोध । घेई कां रें तूं शुद्ध ॥२॥
तारिले तारिले । रामनामें उद्धरिले ॥३॥
शुकादिक योगी झाले । रामनामें तें रंगले ॥४॥
ब्रह्माज्ञानी महा मुनी । रामनाम जपती वाणी ॥५॥
एका जनार्दनीं राम । नाम करी तुं विश्राम ॥६॥
७७३
नामेंचि पावलें पैलपार । शुकादि साचार नामें जगीं ॥१॥
तें नाम सोपें वाचे रामकृष्ण । उच्चिरतीं जाण वैकुंठ जोडे ॥२॥
नामें पावले मोक्षपद गती । नाम हे विश्रांती सर्व जीवां ॥३॥
एका जनार्दनीं नाम हें तारका । वेदाचा विवेक रामनाम ॥४॥
७७४
मागें बहुतां गुणा आलें । रामनाम रसायन चांगलें ॥१॥
बहुतीं सेविलें आदरें । तेणे तरलें भवसागर ॥२॥
शुकें उतरिलें निगुती । दिधलें असे परिक्षिती ॥३॥
सेवितां आरोग्या झाला । एका जनार्दनीं म्हणे भला ॥४॥
७७५
राम आठवितां नुरेचि पैं पाप । ऐसा दाखव मज पा कोणी एक ॥१॥
नाम त्रिभुवनीं वरिष्ठ साचार । म्हणोनि निर्धार सनकदिकीं ॥२॥
एका जनार्दनीं जपतां निर्धारें । भवसिंधु तरे रामनामें ॥३॥
७७६
नामाचा नित्य जया छंद । त्याचा तुटे भवबंध ॥१॥
ऐसा माना रे विश्र्वास । घाला रामनामीं कास ॥२॥
मागील पहा अनुभवें । नामें तारिलें दोषी वैभवें ॥३॥
स्त्रीपुत्रादिक अत्यंज । नामें पावन केलें सहज ॥४॥
यवनादि मोमीन । नामें तरले अधम जन ॥५॥
हाकारुन नाम घोका । सांगे जनार्दन एका ॥६॥
७७७
रामनामीं भाव न धरिती कोणी । नाना मंत्र तंत्र घेती जनीं ।
सकुडी कुंटणी वैकुंठासी नेली । अवचटें राम वदनीं ॥१॥
रामनाम न मानिती जनीं । सैर समाधि हरिकीर्तनीं ॥धृ॥
वारितां नाम प्रल्हाद स्मरे । त्याचे चुकविले नाना घात ।
कोरडिये काष्ठी नर मृग जाला । भक्तां साह्य जगन्नाथ ॥२॥
अभिलाषें नाम अजामेळ स्मरे । तो सोडिला यमकिंकरीं ।
मागील किल्मिष निःशेष जाळिलें । ऐसी नामाची ही थोरी ॥३॥
उफाराटे अक्षरीं रामु नारदमुनी । वाल्मिकासी उपदेशी ।
नष्ट वाटपाडा पुनीत जाला । या महाकवि म्हणविंती त्यासी ॥४॥
रामनाम कीर्तनी कैसें सुख आहे । हें शिवची जाणें साचें ।
दोचि अक्षरी काशी मुक्त केली । तारक ब्रह्मा हें त्यांचें ॥५॥
लाजेच्या संकटीं द्रौपदी नाम स्मरे । देवो वर्षला तिसी अंबरें ।
वैरी याचे शिरीं पाउल आणिला । नामें भक्तकाज सरे ॥६॥
नामाचेनी बळें पाप पुढें पळें । कर्माकर्म तेथें जळे ।
एका जनार्दनीं नाममात्रें । निजीं निजसुखाचे सोहळे ॥७॥
७७८
स्नानाचा परिकळा स्वरवण अडथळा । सकळ मंत्री साचा पाहीं ।
आसनीं शयनीं भोजनीं गमनागमानीं । राम म्हणता दोष नाहीं ॥१॥
श्रीराम जयराम श्रीराम जयराम । जपतां हें दो अक्षरीं नाम ।
संसारातें दळसी कळिकाळा तें कढसी । निरसेल कर्माकर्म ॥धृ॥
योग याग तपें तपताती बापुडें । जन धन शिणताती वेडे ।
निःशंक निर्लज्ज हरिनाम गातां । पायवाट वैकुंठां चढें ॥२॥
गूढ गुह्मा जपसी वाचे श्रीराम । ते नामें जपाचा भावो ।
तेणें नामें भुलला वैकुंठ सांडुनी । कीर्तनीं नाचतो देवो ॥३॥
रामनामें वाचा गर्जती उठी । अमर येती त्याच्याभेटी ।
तीर्थीचे समुदाय अघ्रिरेणु वांछिणी । श्रुति ऐको ठाती गोठी ॥४॥
सकल साधनामांजी वरिष्ठ हें भावें । जपा रामनाम ।
एका जनार्दनीं संतोषला तो । पुरविल निष्काम काम ॥५॥
७७९
रामानाम वदतां वाचे । सुकृत जोडे पैं पुण्याचें ॥१॥
ऐसा नामाचा महिमा । न कळेचि आगमानिगमां ॥२॥
नामें तारिलें पातकी । वंद्य जाहले तिहीं लोकीं ॥३॥
एका जनार्दनीं नाम । सुखा चैतन्य निजधाम ॥४॥
७८०
नाशिवंत सर्व एक नाम साचें । म्हणोनि वदा वाचे श्रीराम ॥१॥
शरीर नासे संपत्ति नासे । नाम न नासे श्रीरामाचें ॥२॥
आकार नसे निराकार नासे । नाम नासे श्रीरामाचें ॥३॥
स्थुळ नासे सुक्ष्म नासे । नाम न नासे श्रीरामांचे ॥४॥
जें न नासे तें नाम वाचे । एक जनार्दनीं साचें जप करीं ॥५॥