संकीर्ण 9
आठा दिशीं सोमवार शिवण झालें बंद
कशिद्याचा तुला छंद उषाताई ८१
पहांटेच्या प्रहररात्रीं धुमधुम डेरा वाजे
कृष्णाला ने ग राधे गोकुळांत ८२
घड्याळ पाहतां वाजलेले तीन
वहिनी उठून चहा करी ८३
वन्संबाईना ती वेणी जाऊबाईंना तो खण
हलव्याला दिली गोण जांवयाला ८४
भाऊ माझा एक भावजया किती
सोळा सहस्त्र गोपी भुलवील्या ८५
मामाराया घर बांधी सुतारांना दिल्या मिरच्या
घरांत आल्या टेबल खुर्च्या मामारायांच्या ८६
माझ्या ओटीवर कागदांचा केर झाला
लिहिणार कोठें गेला गोपूबाळ ८७
माझ्या दारावरनं दुर्वांच्या पाटया जाती
आजोबांची भक्ति मोठी गणपतीची ८८
माझ्या दारावरनं बेलाच्या पाट्या जाती
शिवाजी भक्ति मोठी बाप्पाजींना ८९
कुंकू मी करीन भरीन खिशांत
धाडीन देशांत ताईबाईला ९०
कुंकू मी वांटीन भरीन करंडा
धाडीन नणंदा वन्संबाईना ९१
कुंकू मी वांटीन भरीन कचोळा
धाडीन आजोळा मामीबाईला ९२
कुंकू मी वांटीन भरीन बोगणी
धाडीन बहिणी अक्काबाईला ९३
जाईच्या फुलांचा वास येतसे सुंदर
रामरायाचें मंदिर वाटेवरी ९४
आधीं नमन करू चिंचेच्या पानावरी
विष्णूच्या कानांवरी गोष्टी गेल्या ९५
वर्हाडयांत वर्हाडी गोपुबाळ हा नटवा
मिरवी खांकेस बटवा सुपारीचा ९६
वर्हाडयांत वर्हाडी गोपूबाळाची हुषारी
लग्नीं अच्छेर सुपारी पुरविली ९७
अत्तरदाणी गुलाबदाणी या दोघी ग सवती
दोघींचा एक पति चौफुला तो ९८
अत्तरदाणी गुलाबदाणी कांचेचा हिरवा पेला
पाण्यांत बंगला केला इंग्रजांनी ९९
अत्तरदाणी गुलाबदाणी पाचूपेट्या पिंगारदाणी
आहे हौशी तुझी राणी गोपूबाळा १००