मुलगी 6
नवर्या मुलीला दागदागिन्यांनी नटवतात. जणू लहानशी बाहुली :
नाकी मोंठी नथ तोंडा पडली साउली
चित्रशाळेची बाहुली उषाताई ॥
लहानग्या मुलीचे ते लहानसे नाक, परंतु त्यात मोठी नथ घालतात, सारे तोंड झाकून जाते. कोवळे नाक दुखते :
करवंदी मोत्यांची नथ लाखाच्या मोलाची
आहे कोवळया नाकाची उषाताई ॥
काही काही वर्णने काव्यमय आहेत :
पिवळी नागीण चंदनवेलीला
तसा पट्टा कमरेला उषाताईच्या ॥
दागिन्यांनी वाके जशी लवली ग केळ
नाजूक फूलवेल उषाताई ॥
पंक्तीत नवरी नवर्याच्या पानात बसते. एकमेकांस घास देतात, जणू पहिली तोंडओळख. ओखाणा घेऊन घास देतात. ते वर्णन पहा कसे गोड आहे :
घेऊन ओखाणा नवरी घांस देई
हळूच वर बघे पुन्हा मान खाली होई ॥
नंतर वरात निघते :
झोपाळयांच्या वरातीला मोत्यांचे घोस लावूं
प्रेमाचे गीत गाऊं उषाताईला ॥
वरात येते. नवीन नाव ठेवले जाते. माहेर तुटले, सासर जोडले :
माउलीच्या डोळां घळकन पाणी आले
नांव बदलीलें सासर जोडीलें
नांव नवीन ठेवलें उषाताईला ॥
आता सासरी जायचे. केवढा करुण प्रसंग. या सर्व ओव्या कारुण्याने थबथबलेल्या आहेत. वाचताना डोळे डबडबतात :
काळी कपिला गाय अपुल्या कळपाला चुकली
मला मायेने टाकीली परदारी ॥
नऊ मास होत्यें मायबायेच्या उदरी
आता मी परघरी लोक झाल्यें ॥
या ओव्या हृदयाला घरे पाडतात, डोळयाला झरे फोडतात, भाऊ समजावतो, बहिणीच्या पदरी पेढे बांधतो. बाप म्हणतो, शहाणी आहेस, रडू नकोस. आईला राहवत नाही :
सासर्या जातांना माय धरीते पोटाशी
तान्ह्ये कधी ग भेटशी उषाताई ॥