मायलेकरे 22
शेजीने दिली शिवी लागली माझ्या जीवी
आयुष्याची तुला ओवी तान्हेबाळा १६१
शेजीने दिली शिवी हृदय झाला भेद
समजूं आशीर्वाद तान्हेबाळ १६२
शेजीने रागानें तान्हेबाळा शिव्या दिल्या
पदरी घेतल्या जाईजुई १६३
शेजी देते शिव्या तान्हेबाळाला देखोनी
जाईमोगर्याच्या कळया ओटी घेत्ये मी वेचोनी १६४
शेजीने दिली शिवी जिची तिला पडो
माझा कडुलिंब वाढो गोपूबाळ १६५
शेजीने वाहिली शिव्यांची लाखोली
पुष्पपूजा झाली बाळराजा १६६
शेजीने दिली शिवी वेचून घेतली
कळी मी मानिली शेवंतीची १६७
शेजी आली घरा तुम्ही बसा बसा बाई
अन्याय केला काई तान्हेबाळाने १६८
शेजी आली घरा पाट देऊं बसायला
अन्याय पुसायला तान्हेबाळाचे १६९
शेजी आली घरा धरीले मनगटी
अन्याय घाल पोटी तान्हेबाळाचे १७०
आहेत तुझी मुलें तुला मी काय सांगू
पुरे कर ग शेजीबाई कितीदा मी क्षमा मागूं १७१
चुकलें माझें बाळ तुझ्या किती पाया लागूं
आतां माझे शेजीबाई विसर ग प्रेमें वागू १७२
टोचून बोलती परके चटचटा
बाळाच्या डोळयांना पाणी येई पटापटा १७३
टोचूंन बोलती कोंवळे तुझे मन
उगी रडून रडून दमशील १७४
इवलासा गुन्हा किती बाळाला बोलती
मेरू मोहरीचा करिती लोक मेले १७५
खेळशी खेळ गडया विटीदांडू रे मोगर्या
तुझ्या दांडूला घागर्या तान्हेबाळा १७६
लहान लहान बाळ खेळती आटया- पाटया
रंगीत तुझ्या गोटया तान्हेबाळा १७७
लहान लहान मुलें खेळती विटीदांडू
रंगीत तुझा चेंडू तान्हेबाळा १७८
खेळशी खेळ गडया विटीदांडू पैलथडी
भागले तुझे गडी गोपूबाळा १७९
अंगाई मंगाई तांबूले गंगाई
तान्हेबाळाने दंगाई मांडीयेली १८०