तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 11
दिंडी- दरवाज्याने भार्गवराम येतो जातो
शुक्रवारी वाजा होतो चौघड्याचा १०१
दिंडी- दरवाज्याने भार्गवराम येतो जातो
नळ सोडून पाणी घेतो संध्येसाठी १०२
रेणुकामाईचा भार्गवराम तान्हा
सभामंडपी पाळणी बांधीयेला १०३
तिन्ही देवांमध्ये भार्गवराम उंच
सव्वा खंडी चिंच उत्सवाला १०४
तिन्ही देवांमध्ये भार्गवराम काळा
त्याच्या गळां माळा रुद्राक्षांच्या १०५
तिन्ही देवांमध्ये भार्गवराम जुना
सव्वा खंडी चुना देवळाला १०६
भार्गवराम देव उभे रेड्यावरी
निळया घोड्यावरी स्वार झाले १०७
अक्षय तृतीयेला उद्कुंभ द्यावा
मनांत स्मरावा भार्गवराव १०८
अक्षय तृतीयेला जन्मले परशुराम
मातेला मारूनी पुरवीती पितृकाम १०९
एकवीस वेळां नि:क्षत्री केली धरणी
अद्भुत वाटे करणी परशुरामाची ११०
केशर कस्तुरी बारा रुपये तोळा
श्रीमंत लावी टिळा भार्गवराव १११
कस्तुरीचा वास माझ्या ओच्याला कुठूनी
आले सख्याला भेटूनी भार्गवरामा ११२
देवांमध्ये देव रामेश्वर अतिकाळा
त्याच्या दोंदावर रुद्राक्षांच्या रुळती माळा ११३
दिवसांची दिवटी तेथें एवढा कोण राजा
कुळस्वामी देव माझा पालखीत ११४
शेवंती फुलली नऊशे पाकळी
शाळुंका झांकली सोमेश्वराची ११५
आठ दिवसांच्या शनिवारी वाडी गांवाला वारी वाटा
श्रीपाद स्वामी माझा वाडी गांवचा वैद्य मोठा ११६
संकटाच्या वेळे कोणे ग पावला
नवसाला आला दत्तात्रेये ११७
आठा दिशी आदितवार नाहीं मजला कळला
देव भंडारा खेळला जेजुरीचा ११८
खोबर्याच्या वाटया हळदी भरल्या
देव भंडारा खेळला जेजुरीचा ११९
सिंहस्थी नाशीक कन्यागती वाई
जो जो कोणी जाई मुक्त होई १२०