देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 19
दही, दूध लोणी चोरून वांटीतो
कौतुक करीतो बाळकृष्ण २२१
कां ग सखी तुझे डोळे लाल धुंद
काननी गोविंद वाजवितो २२२
गोवर्धनगिरी बोटाने उचली
वाढतो गोकुळी कंस शत्रु २२३
गायी गोवर्धनी चरती बारा रानें
पावा जनार्दनें वाजवीला २२४
यशोदा म्हणतें कृष्ण माझा वरसाचा
कसा तो गोरसाचा नाश करी २२५
कृष्णनाथ काळा जसा उडीदाचा दाणा
सोळा सहस्त्र गोपांगना भूलवील्या २२६
माझ्या दारावरून रंगीत गाडी गेली
कृष्णानें राधा नेली गोकुळांत २२७
वाढतां वाढतां सुटे द्रौपदीची चोळी
गोविंद सांभाळी तिची लाज २२८
चतुर्भुज केली द्रौपदी निज सखी
भक्तांची लाज राखी भगवंत २२९
दोन हातीं वाढी दोन हाती बांधी
सांवळी द्रौपदी मांडवात २३०
राजसूय यज्ञीं दुर्जन हासले
चतुर्भुज देवे केले द्रौपदीला २३१
राजसूय यज्ञी द्रौपदीचें तुटे बिरडे
चतुर्भुज की गोविंदे तिला केले २३२
जाहले कौतुक टकमक पाहती
पाठीराखा कमळापति द्रौपदीचा २३३
पाठीची बहीण सुभद्रा होती जरी
प्रीति द्रौपदीच्या वरी गोविंदाची २३४
राजसूय यज्ञीं द्रौपदी वाढी मीठ
नथींतील टीक झळाळती २३५
राजसूय यज्ञीं द्रौपदी वाढी ताक
तिच्या दंडातील वांक झळाळली २३६
राजसूय यज्ञी द्रौपदी वाढी मठ्ठा
कमरेचा कमरपट्टा झळकला २३७
राजसूय यज्ञी द्रौपदी वाढी भात
नाकांतील नथ झळकली २३८
राजसूय यज्ञी द्रौपदी वाढी खीरी
गळयातील सरी झळकली २३९
राजसूय यज्ञी द्रौपदी वाढी वडे
हातांतील तोडे झळकले २४०