मायलेकरे 38
हट्ट नको घेऊ त्रास नको देऊ
नीट वाग पाहूं तान्हेबाळा ४८१
सारखी किरकीर नको करूं राजा
फजीतवाडा माझा होई बाळा ४८२
टोचून बोलतील हळवे माझें मन
छळूं नको रे रडून माऊलीला ४८३
मला हौस मोठी सोन्याच्या जानव्याची
मुंज करा तान्हेयाची गोपूबाळाची ४८४
पांचा वरसांचा मुंजीची काय घाई
वाटते सून यावी मायबाईला ४८५
मुंजीचा मुहूर्त मामा पुसतो जोश्याला
चंद्रबळ भाचेयाला गोपूबाळाला ४८६
मुंजीचा मुहूर्त दशमी एकादशी
चंद्रबळ तुझ्या राशी गोपूबाळा ४८७
उखळी मुसळ पोहे कांडायला
गोपूबाळाचे मुंजीला आणीयेलीं ४८८
भिंती सारवल्या वर काढिली केरेंमोरे
तुझ्या मुंजीची आमंत्रणे तान्हेबाळा ४८९
नदीपलीकडे हिरव्या शालूच्या दोघीजणी
मुंजीची बोलावणी तान्हेबाळाच्या ४९०
भिंती सारवून वर काढावें ताम्हण
तुझ्या मुंजीचे सामान तान्हेबाळा ४९१
सोनाराच्या आळी कशाची ठोकाठोकी
माझ्या ग बाळाच्या मुंजीची ताटवाटी ४९२
मुंजा ग मुलाला मोत्यांच्या मुंडावळी
ओवींते चंद्रावळी उषाताई ४९३
मुंजीचे लगीन बापलेका लागे
परके दारी वागे मायबाई ४९४
पिवळया पाटावाची घडी उकलतें नेस
मातृभोजना तूं बैस उषाताई ४९५
मातृभोजनाला पाट मांडीले चोवीस
मातृभोजनाला बैस उषाताई ४९६
पहिली भिक्षावळ आई घालते नारळ
शतायुषी होवो बाळ माउलीचा ४९७
पहिली भिक्षावळ मामा मावशीची
तुझ्या आजोळींची गोपूबाळा ४९८
पहिली भिक्षावळ माय घालीते बत्तासा
विजयी होई कसा तान्हेबाळा ४९९
एके हाती दंड दुजा हाती झोळी
भिक्षा मागे ब्रह्मचारी गोपूबाळ ५००