सुखदु:खाचे अनुभव 29
काय मीं पुण्य केलें आईपरी सासूबाई
कमळीं अंबाबाई पूजीयेली ३६१
काय मी पुण्य केलें बापासारखा सासरा
कमळीं हरिहरा पूजीयेला ३६२
काय मीं पुण्य केलें बापासारखा सासरा
कमळीं सोमेश्वरा पूजीयेला ३६३
काय मीं पुण्य केलें बापासारखा सासरा
सरीखाली ग दुसरा चंद्रहार ३६४
मामंजी सासूबाई तुम्ही तुळशीची झाडे
आम्ही तुमच्या उजेडे राज्य करूं ३६५
मामंजी सासूबाई तुम्ही तुळशीची मुळें
आम्ही परक्यांची बाळें सांभाळा हो ३६६
लक्षुमी लक्षुमी हांक मारीतो सासरा
तुझ्या कामाचा पसारा वैनीबाई ३६७
लक्षुमी लक्षुमी हाका मारी दीर
काढ ओसरीचा केर वैनीबाई ३६८
ब्राह्मण जेवती उत्तम झाला पाक
पवित्र तुमचा हात सासूबाई ३६९
मामंजी म्हणती धन्य ग सूनबाई
कुळाला कळा येई तुझ्या गुणें ३७०
मामंजी म्हणती धन्य ग सूनबाई
नातू दिला लवलाही मांडीवरी ३७१
मामंजी म्हणती सून ही गुणांची
होती राशी ही पुण्याची माझ्या बाळाची ३७२
मामंजी म्हणती सूनबाई जेव आधीं
वाढतो पोटामधी कुळतंतू ३७३
मामंजी म्हातारे रागानें होती लाल
जाईल कोण जवळ विस्तवाच्या ३७४
माहेरा आलीस नको करूं कामधंदा
तुझ्या सांग पुरवीन छंदा तान्हेबाळी ३७५
माहेरा आलीस नको करू काम कांही
आतां विसावा तूं घेई उषाताई ३७६
माहेरा आलीस आतां बाळे हास खेळ
सुखानें नेई वेळ उषाताई ३७७
माहेरा आलीस काय तुझ्यासाठी करूं
पिकला आंबा चिरूं उषाताई ३७८
माहेरा आलीस सांग तुला देऊं काय
खाई दुधावरची साय तान्हेंबाळे ३७९
माहेरा आलीस नीज आतां नको उठूं
करी बाळे गुरगुंटी उषाताई ३८०