संकीर्ण 2
सीतेलाही कष्ट भोगावे लागले; मग आपली काय कथा ?
दळताना शेजारचीही बाई एखादे वेळेस प्रेमाने हात लावायला येते. दळण पटकन् होते. जाते जड जात नाही; दळण संपत आले म्हणजे ती बाई कृतज्ञतेने म्हणते :
सरलें दळण घालूं शेवटचा घास
असाच हात लावी शेजी तुझी मला आस
किती गोड व सहृदय ओवी ! शब्दरचनाही कर्णमधुर अशी आहे.
बायका नेहमी दळतात. परंतु ज्या जात्यावर दळायचे त्या जात्याचे कौतुक त्यांनी केले आहे का ? ते जाते पाहून त्यांची प्रतिभा स्फुरली का ? होय; स्फुरली बरे. जाते, जात्याचा खुंटा व जात्यावर ओव्या म्हणणार्या सावळया सुंदरीचा गोड गळा सारे एका ओवीत आणले आहे पाहा :
जाते कुरुंदाचें खुंटा आवळीचा
गळा माझ्या सावळीचा आहे गोड
कुरुंदी दगडाची ती तांबडट जाती जरा हलकी येतात. सुंदर बांगड्या असलेला हात जाते ओढत आहे !
जाते कुरुंदाचें खुंटा पाषाणाचा
वर हात कांकणाचा उषाताईचा
पाषाणाचा खुंटा कसा असेल ते देव जाणे ! एखादा दगडी खुंटाच बसलेला असे की काय ? जात्याच्या तोंडाला दिलेली सुंदर उपमा वाचा :
जातियाचें तोंड जशी खोबर्याची वाटी
याचा कारागिरी नांदतो बालेवाटी
भुकेला ब्राह्मण पोटाला हात लावी
दुरून घर दावी भाईरायाचें
गावात परप्रांतीय भिक्षुक ब्राह्मण येतात. त्यांना देशवारकरी म्हणतात. एखादी सासुरवाशीण ओसरीत येते. भुकेलेला ब्राह्मण पोटाला हात लावतो. परंतु येथे जेवायला रहा असे सांगायला ती सासुरवाशीण धजत नाही. तिच्या मनांत कितीही असले तरी सासूसासर्यांच्या हवे ना ? ती आपल्या भावाचे घर ब्राह्मणाला दाखवते. आपला भाऊ उदार आहे, तो नाही म्हणणार नाही असा तिचा आत्मविश्वास असतो. भावाविषयी किती हे प्रेम :
देवा मी दुबळी नेसेन धाबळी
येईन राऊळीं तिन्हीं सांजा
एक म्हातारी आजीबाई म्हणते :
गांव बिघडला सारे झाले गुंड
कोपेल वक्रतुंड गजानन