बहिण-भाऊ 6
चंदनाचे पाट मांडीले हारोहारीं
आज आहे माझ्या घरीं भाऊबीज ॥
कधी भाऊ भाऊबीजेला बहिणीच्या घरी येतो किंवा तिला घरी माहेरी नेतो. माहेरी सार्या बहिणी जमलेल्या असतात. भाऊबीज होऊन जावी. पुन्हा सासरी जाण्याची वेळ यावी. त्या वेळी बहिणी म्हणतात :
आम्ही चारी बहिणी चार डोंगराच्या आड
माझ्या भाईराया खुशालीचें पत्र धाड ॥
आम्ही चौघी बहिणी चारी गावांच्या चिमण्या
सख्या भाईराया आम्ही घटकेच्या पाहुण्या ॥
दादा, वर्षातून एकदा आम्हाला भेटत जा, एकदा आणीत जा, आम्ही घटकाभर राहू, प्रेम लुटू व उडून जाऊ. एक चार आण्याचा साधा खण व रात्रभर तुझ्या घरी विसावा. दुसरे काही नको :
बहिणीला भाऊ एक तरी गे असावा
पावल्याचा खण एका रात्रीचा विसांवा ॥
माहेरी गेल्यावर भाऊभावजय कशा वागतात ते बहिणींना कळून येते भावजयीला बहिणी म्हणतात :
दसरा दिवाळी वरषाचे दोन सण
नको करूं माझ्यावीण वयनीबाई ॥
माहेरी जावे तो भावजयीला बरे वाटत नाही. नणंदा कशाला आल्या असे तिला वाटते :
गोर्ये भावजयी नको बोलूं रागें फार
आल्ये मी दिवस चार माहेराला ॥
परंतु ही प्रार्थना फुकट जाते. धुसफूस सुरू असते. बहीण मनात म्हणते.
गोरी भावजय गर्विष्ठ बोलाची
मला गरज लालाची भाईरायाची ॥
भाऊ ग आपला वयनीबाई ती लोकाची
मने राखावी दोघांची ताईबाई ॥