ऋतुवर्णन, सृष्टिवर्णन 5
ऋतुवर्णन, सृष्टिवर्णन : ओव्या
पाऊस पडेना पडेना एक थेंब
फुटेना एक कोंब धरणीला १
पाऊस पडेना सुकले नद्या नाले
गुरावासरांचे झाले भारी हाल २
पाऊस पडेना सुकलीं सारीं तळीं
सुकल्या वृक्षवेली रानींवनी ३
पाऊस पडेना देव कोपलासे भारी
देवांवाचून कोण तारी त्रिभुवनी ४
पाऊस पडेना सुकली सारी तोंडे
राग कां गोविंदे केला आहे ५
पाऊस पडेना पिकेल कशी शेती
होईल सारी माती संसाराची ६
पाऊस पडेना प्राण येती कंठी
कधी तो जगजेठी करिल कृपा ७
पडेल पाऊस बघा झाले मेघ गोळा
आला हो कळवळा देवबाप्पा ८
पावसाची चिन्हें दिसती आभाळी
मेघांची गर्दी काळी जाहलीसे ९
मेघांची आकाशी गर्दी झालेली पाहून
मोर नाचे आनंदून वनामध्यें १०
मोर नाचतांना मोर अश्रू ते गाळिती
लांडोरी चाखीती आनंदोनी ११
पड रे पाऊसा पिकूं दे दाणापाणी
भाईरायाला बहिणी आठवीती १२
पाऊस पडतो पडतो काळाकुट्ट
धरणीमाता हिरवी जोट पांघुरली १३
पाऊस पडतो थांबेना पागोळी
धरणीमाय हिरवी चोळी घालीतसे १४
पडतो पाऊस ओल्या झाल्यात कामिनी
भाकरीच्या पाट्या शेता जातात घेऊनी १५
पाऊस पडतो ओल्या झाल्यात जमिनी
या ग पेरणीच्यासाठी शेता जाती सुवासिनी १६
पाऊस पडतो पागोळ्या पाणी गळे
माणीक दारी खेळे उषाताई १७
पाऊस पडतो पडतो मुसळधार
गंगेला आला पूर दोन्ही थडी १८
पाऊस पडतो गरजे पाणी पडे
आकाश जणूं रडे रात्रंदीस १९
पाऊस पडतो पडतो सारखा
सूर्य झालासे पारखा चार दिवस २०