मुलगी 8
मुलगी : ओव्या
पुत्र झाला म्हणून साखर वाटली
पुत्र नाही कन्या झाली शांताबाईला १
कन्या झाली म्हणून नको करू हेळसांड
गोपूबाळाच्या शेजारी उषाताईचा पाट मांड २
कन्या झाली म्हणून नको घालू खाली मान
घडेल कन्यादान काकारायांना ३
लेका ग परीस लेक ती काय उणी
हिरा नव्हे हिरकणी उषाताई ४
लाडकी झाली लेक घास जाईना तिच्या तोंडा
बापाशेजारी पाट मांडा उषाताईचा ५
लाडकी झाली लेक लाड करूं मी कशाचा
चंद्रमा आकाशींचा मागतसे ६
साठयांच्या दुकानी देखीली फडकी
बापाची लाडकी उषाताई ७
साठयांच्या दुकानी उंच गझन मोलाची
बहीण भावाच्या तोलाची उषाताई ८
कापड दुकानी देखीली लाल साडी
बापाची झोप मोडी उषाताई ९
अंबा मोहरला मोहरला पानोपानी
बापाच्या कडे तान्ही उषाताई १०
लाडकी ग लेक लाड मागते बापाला
माझी उषाताई मोती मागते कापाला ११
माझ्या अंगणात शेजीचे पांच दाजी
पायी पैंजण मैना माझी उषाताई १२
माझ्या अंगणात शेजीचे पांच लाल
त्यांत माझी मखमल उषाताई १३
माझ्या अंगणात शेजीचे पांच पुत्र
त्यात माझी चंद्रज्योत उषाताई १४
माझ्या अंगणात शेजीबाईंची माणके
उषाताई ग सारखे एकनाही १५
माझ्या अंगणात सांडली दूधफेणी
जेवली उषाताई शोभे शुक्राची चांदणी १६
माझ्या अंगणात ठेवीली तूपपोळी
जेवीली चाफेकळी उषाताई १७
लांब लांब केस मला वाटे काळा साप
अंग गोरे गोरे झाक उषाताईचे १८
गोर्या ग अंगाला शोभती काळे केस
काळोख्या रात्रीत शोभे चंद्रमा सुरेख १९
लांब लांब केस तुझ्या केसांची पडली छाया
देत्ये चौरंग बैस न्हाया उषाताई २०