बहिण-भाऊ 20
दांडपट्टा खेळे करी तरवारीचे हात
घोडा नेई दौडवीत भाईराया १२१
हत्तीच्या सोंडेवरी मोहनमाळा लोळे
तालीमपट्टा खेळे भाईराया १२२
हत्तीच्या सोंडेवरी ठेवीली सुपारी
स्वारी निघाली दुपारी भाईरायाची १२३
माझे दोघे भाऊ देवळाचे खांब
अभंग प्रेमरंग भला ठावे १२४
माझे दोघे भाऊ बिल्लोरी आरसे
देवळीं सरीसे लावीयेले १२५
माझे पांच भाऊ ते ग मला बहू
ईश्वरावरी गहूं वाहीयेले १२६
माझे पांच भाऊ देवळाच्या भिंती
गिलावा देऊ किती आयुष्याचा १२७
माझे दोघे भाऊ मला ते वाणीचे
देवाच्या दारीचे कडुलिंब १२८
------------
टीप- १. वाणीचे म्हणजे नवसाचे; उत्कृष्ट. वाणीचा हुरडा म्हणजे उत्कृष्ट बियांचा, विशिष्ट जातीचा हुरडा.
२. भावांना कडुलिंब म्हटले आहे. कारण ते नवसाचे. नवसाच्या मुलावर दृष्ट पडू नये म्हणून मुद्दाम त्याचे नाव भिक्या, धोंडया असे ठेवतात. परंतु हे कडुलिंब देवाच्या दारचे म्हणजे अमृताहून गोड आहेत.
अंगणात उभा जन म्हणे राजा
मी म्हणे भाऊ माझा आला भेटी १२९
माझा भाईराया कसा का असेना
त्याच्यासाठी प्राणा टाकीन मी १३०
माझा भाईराया मनीं मी आठवीन
पोटांत सांठवीन निरंतर १३१
माझा भाईराया ओंव्यांत गाईन
हृदयीं स्मरेन रात्रंदीस १३२
ध्यानीं मी पाहीन स्वप्नीं मी पाहीन
प्रेमाची मी बहीण भाईरायाची १३३
बहिणीला भाऊ एक तरी ग असावा
पावल्याचा खण एका रात्रीचा विसांवा १३४
आवड मला बहू लुगडे नको घेऊं
अंतर नको देऊं भाईराया १३५
माझे दारावरुन नको जाऊ मुक्यामुकी
नको घेऊं साडीचोळी मी रे शब्दाची हो भुकी १३६
भाऊ चोळी शिवी शिवी आपल्या रुमालाची
धन्य तुझ्या इमानाची भाईराया १३७
माझ्या आयुष्याचा भाईराजा तुला शेला
उरल्याची चोळी तुला वयनीबाई १३८
माझ्या आयुष्याची भाईराया तुला कंठी
उरल्याची तुला आंगठी वयनीबाई १३९
माझें कीं आयुष्य कमी करून मारुती
घाल शंभर पुरती भाईरायाला १४०