सुभाषिते 6
कुतरा भुंकतो भुंकतो भीतभीत
रानांत हुंकारत पंचानन २१
हंस धीर गति कावळे कोकलती
मूर्खांना उपेक्षिती बुध्दिमंत २२
नको तीर्थयात्रा नको चारी धामें
मुखी घ्यावी नामें विठ्ठलाचीं २३
नको तीर्थयात्रा नको सप्त पुर्या
मुखीं ओव्या गाव्या विठ्ठलाच्या २४
नको तीर्थयात्रा नको अन्य नेमव्रत
माझे पवित्र दैवत मायबाप २५
रामराम म्हणुनी राम माझ्या हृदयांत
जसे मोती करंड्यांत वागवीतें २६
चंद्राच्या प्रकाशीं लोपून जाती तारा
थोरांपुढे तोरा मिरवूं नये २७
चांदण्यांनो तुम्ही अंवसे राज्य करा
थोर नसतां गल्बला करावा कीं २८
कुतरा भुंकतो घराच्या सभोंती
घर रानीं गर्जती सिंहव्याघ्र २९
आज काय जालें खळें पडलें चंद्राला
कोणी पापी का संताला छळिताहे ३०
पुराणींच्या गोष्टी गोड ऐकायाला
तसे वागायला अवघड ३१
पुराणींच्या गोष्टी देवळांत गोड
संसाराची ओढ कोणा सुटे ३२
पुराणींच्या गोष्टी सखी पुराणीं राहती
जन हे वागती यथातथा ३३
आकाशामधून केवढा तारा तुटे
पतनावांचून कोणी ना जगी सुटे ३४
फुलें कोमेजती तारे वरचे तुटती
सर्वांना आहे च्युती संसारात ३५
फुलें सुकतात तारे गळतात
असे कोण ग अच्युत संसारात ३६
चूल सारवीती जशी नित्य ग नेमानें
तसें मन हे भक्तीने सारवावें ३७
सारे बुडबुडे कांही संसारी टिकेना
हें ग मरण कुणाही कधी काळी चुकेना ३८
जो जो प्राणी आला माउलींच्या पोटी
धरित्रीच्या पोटीं तो तो जाई ३९
तिकिट संपता सोडती आगिनगाडी
सोडावे लागे जग आयुष्याची सरतां घडी ४०