मुलगी 12
भिंती सारवून वर काढावी सुखड
तुझ्या लग्नाचे पापड उषाताई ८१
भिंती सारवून वर काढीले नारळ
तुझ्या लग्नाचा फराळ उषाताई ८२
भिंती सारवून वर काढूं केरेंमोरें
तुझ्या लग्नाचे सोयीरे जमताती ८३
भिंती सारवून वर काढावा पोपट
तुझ्या लग्नाची खटपट उषाताई ८४
भिंती सारवून वर काढावी परात
तुझ्या लग्नाची वरात उषाताई ८५
लगीन ठरलं करीती केळवण
जरीचे मिळती खण उषाताईला ८६
करा केळवण आहे मुहूर्त समीप
आला घाईचा निरोप मामारायांचा ८७
करूं केळवण लाडक्या भाचीला
मनांत आनंदला मामाराया ८८
ओल्या हळदीचें वाळवण दारी
केळवण घरीं उषाताईला ८९
ओल्या हळदीचें वाळवण घाला
केळवण तुला उषाताई ९०
दिवसा दळूं कांडूं रात्रीं पापडाचें
लगन तांतडीचें उषाताईचें ९१
दिवसा दळूं कांडूं रात्रीं पापडपीठी
धाडूं लग्नचिठी अप्पारायांना ९२
जातें घडघडे उडदाच्या डाळी
पापडाचें दळी अक्काबाई ९३
वाटेवरलें घर ओंवीयांनी गर्जे
लगीनघर साजे बाप्पाजींचें ९४
हळद कुटीतां मुसळें घुमती
तुला बाशिंगें शोभती गोपूबाळा ९५
सासू-सासर्यांची येऊं द्या मांडवा
हात लागूं दे लाडवा शांताताईचा ९६
सासू-सासर्यांच्या बोलवा पांचजणी
नवरा आहे देवगणी गोपूबाळ ९७
लगन उतरलें उतरलें तळयाकांठीं
नवरी जडावाची उषाताई ९८
लगन उतरलें आंबराईच्या पिंपळाखालीं
नवरी पिवळया छत्राखालीं उषाताई ९९
मांडव घातला पृथिवीचा मेज
लेकी कन्यादान तुझं उषाताई १००