तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 8
पंढरपुरींची होईन पायरी
येतां जातां हरी पाय ठेवी ४१
पंढरपुरीचा होईन खराटा
झाडीन चारी वाटा विठ्ठलाच्या ४२
पंढरपुरीची होईन पोफळी
सुपारी कोवळी विठोबाला ४३
विठोबाला रात्र झाली पंढरीच्या बाजारांत
रुक्मिणी दरवाज्यांत वाट पाहे ४४
विठोबाला एकादशी रखुमाई माडी चढे
तबकां आणी पेढे फराळाला ४५
विठोबा माझा बाप रखुमाई माझी आई
मला पंढरीसी नेई कृष्णाबाई ४६
विठोबा माझा बाप रखुमाई माझी आई
बहीण चंद्रभागा पुंडलीक माझा भाई ४७
मजला नाही कोणी तुजला आहे रे माहीत
यावे गरुडासहित पांडुरंग ४८
माझ्या धांवण्याला कोण धावेल दूरचा
राजा पंढरपूरचा पांडुरंग ४९
विठोबा माझा बाप माहेर माझे करी
पिंजरेने ओटी भरी रखुमाई ५०
विठोबा माझा बाप रखुमाई माझी आई
त्या नगरीचे नांव काई पंढरपूर ५१
पंढरीची वाट कोण्या पाप्याने नांगरीली
गाडी बुक्क्क्यांची उधळली विठ्ठलची ५२
समुद्र आटला मासा करपला
शेला झळकला विठ्ठलाचा ५३
भाजी घ्या भाजी घ्या भाजी घ्या माठाची
आली गवळण थाटाची मथुरेची ५४
भाजी घ्या भाजी घ्या भाजी घ्या मेथीची
आली गवळण प्रीतीची द्वारकेची ५५
दही घ्या दही घ्या दही घ्या गोड गोड
आली गवळण गोड गोकुळीची ५६
चला जाऊं पाहूं कोल्हापुरी राहूं
ओवियांत गाऊं अंबाबाई ५७
कोल्हापूर शहर भोंवती तांबट
नवें घडवीत ताट अंबाबाईला ५८
कोल्हापूर शहर भोंवती पटवेकरी
पटवीली गळेसरी अंबाबाईची ६०