संकीर्ण 3
एक स्त्री आपुल्या गावची स्थिती वर्णिते :
गावातील मोठमोठे लोकही जर मोहाला बळी पडू लागले तर आशा तरी कोणती ?
गांव बिघडला गांवाची गेली शोभा
मोठमोठे लोक लोभा गुंतताती
आणखी एक ओवी सांगू ? प्रत्येक गावांत मारुतीचे देऊळ असतेच. मारुती ब्रह्मचारी-जितेंद्रिय. गावात मारुती असणे याचा अर्थ गावाने संयमी व्हावे, सेवक व्हावे परंतु :
गांव बिघडला झाले सारे व्यभिचारी
कोपेल ब्रह्मचारी मारुतिराय
असे ही भगिनी सांगत आहे.
“पहाटेच्या प्रहर-रात्री” हा पहिला चरण असलेल्या बर्याच ओव्या या प्रकरणात दिलेल्या आहेत. ही ओवी ऐका :
पहांटेंच्या प्रहररात्रीं कोण राणी ओव्या गाते
पुत्राला नीजविते उषाताई
पहाटे काकडआरत्या सुरू होतात, देवळात झांजा वाजतात. काशाच्या धातूचे कर्णे वाजतात :
पहाटेच्या प्रहरी कर्णा वाजतो मंजुळ
दह्या-दुधाची आंघोळ विठ्ठलाची
तिन्ही सांजा झाल्या म्हणजे भिक्षा घालू नये. विशेषत: भिकारणी जोगिणींना घालू नये. त्यांची मुलाबाळांवर दृष्ट पडायची एखादी.
तिन्ही सांजा झाल्या उंबर्याला रक्षा
जोगिणीला भिक्षा घालूं नये
हल्लीच्या मुलींवर ओव्यांतून टीका झाली आहे.
हल्लींच्या मुलींना काम नको डोळ्यांपुढे
लक्ष लिहिण्याकडे उषाताईचें
वाकडे भांग हवेत, कुंकू आहे नाही असे बारीक; खोपा घालण्याऐवजी केसांची चकरे करायची, या सर्वांवर टीका आहे :
हल्लीच्या बायका चकरें घालीती
वर फुल ते खोविती शेवंतीचें
घरात आता घडयाळे आली आहेत. मुंबई टाइम, मद्रास टाइम हा फरकही समजू लागला :
मुंबई मद्रास मागे पुढें तास
किती वाजले तपास गोपूबाळा
बायकांना कुंकवाचे वेड. सौभाग्याचे ते चिन्ह. ते कुंकू सर्वांना पाठवायची हौस; बहिणीला पाठवीन, मामींना पाठवीन, वन्संबाईना पाठवीन. ह्या सौभाग्यचिन्हाला सर्वत्र धाडू दे, सदिच्छा प्रकट करू दे
कुंकू मी वांटीन भरीन कचोळा
धाडीन आजोळा मामीबाईला
गावातील सर्वांना बोलावून त्यांना कुंकू वाटायचे. मग बाहेरगांवच्या नातलगांना, मैत्रिणींना नको का धाडायला ?
ही एक विनोदप्रचुर ओवी ऐका :
वर्हाडयांत वर्हाडी गोपूबाळाची हुषारी
लग्नी अच्छेर सुपारी पुरविली