मायलेकरे 37
आई नको धाडू कधी मला मोठयाकडे
विचारीना तेथे कोणी मग येते मला रडें ४६१
जाईच्या फुलासाठी बाळे फांदी ओळंबली
देवपूजा खोळंबली बाप्पाजींची ४६२
जाईचा मंडप नको मोडू फांद्या
ऐक राजा रे गोविंदा तान्हेबाळा ४६३
फुलें वेचूनीया तान्हेबाळाने आणीली
पूजेसाठी झाली बाप्पाजींना ४६४
हट्ट नको घेऊं सूर्यनाथ डोक्यावर
तूं रे राजा सुकुमार सुकशील ४६५
हट्ट घेऊ नको आहे दुपारचे ऊन
जाशील सुकून तान्हेबाळा ४६६
हट्ट घेऊ नको शुभं करोतीला म्हण
होई नीट सुलक्षण तान्हेबाळा ४६७
हट्ट नको घेऊ येईन मी उठाउठी
खाऊ देईन दोन्ही मुठी भरूनीया ४६८
पाहुणे घरी आले सांग त्यांना नाव नीट
नको लाजूं होई धीट तान्हेबाळा ४६९
पाहुणे घरी आले श्लोक दाखवी म्हणून
घेतील कौतुकाने तुला मांडी ४७०
पाहुणे घरी आले स्तोत्र म्हण तोंडपाठ
थोपटतील तुझी पाठ तान्हेबाळा ४७१
पाहुणे घरी आले घरी जरा नीट वाग
काम करायला लाग माऊलीचे ४७२
पाहुणे घरी आले नको ठेवू देऊ नाव
हीच बाळा एक हाव माउलीची ४७३
पाहुणे घरी आले करितील तुझी स्तुति
अशी करावी ही कृती तान्हेबाळा ४७४
पाहुणे आलेले गेले निघून हो काल
आवडले माझे बाळ पाहुण्यांना ४७५
पाहुणे आलेले गेले निरोप घेऊन
खाऊ हातात देऊन तान्हेबाळाला ४७६
पाहूणे आलेले गेले हो काल रात्री
रुपया दिला हाती तान्हेबाळाच्या ४७७
कोण बागुलबोवा बैसला माये ओटी
काकाजी आले भेटी तान्हेबाळा ४७८
मोठया मोठया मिश्या भली मोठी शेंडी
होतसे घाबरगुंडी तान्हेबाळाची ४७९
काय रे झाले बाळा काही नाही घेती मुका
रुतती दाढी मिश्या काकाजींच्या ४८०