मायलेकरे 26
माझ्या मांडीवरी पारवे घुमती
बाळें ग रमती घरांमध्ये २४१
गायींनी भरला गोठा म्हशींना झाली दाटी
यशवंत तुझी काठी तान्हेबाळा २४२
गायी गोठीयांत म्हशी वाडीयांत
बाळ पाळण्यांत दूध मागे २४३
काळया ग गायीचे दूध ग गोड लागे
वाटीभर मागे तान्हेबाळ २४४
काळे ग गायींचे दुध मोडाईचे
बाळ बढाईचें ताईबाईचे २४५
ये ग तूं ग गायी चरशील कोंडा
तान्हा बाळाच्या ग तोंडा दुधमांडा २४६
ये ग तूं ग गायी चरून वरून
तान्ह्या बाळाला दूध पाजूं २४७
गायी ग चरती कोंवळी कणीसें
तान्हेबाळाला नीरसें दूध पाजूं २४८
गायी हंबरती प्रेमाचा पान्हा फुटे
गळयाचें दावे सुटे वांसरांच्या २४९
गायीचा गोवारी म्हशीचा खिल्लारी
तान्हेबाळाचा कैवारी गोकुळीचा २५०
गायी ग चरती वांसरें कोठें गेलीं
गंगेच्या पाण्या नेली तान्हेबाळाने २५१
गायी ग चरती कोंवळा ग चारा
दुधाच्या चारी धारा वांसरांना २५२
गायी ग चरती वांसरे हंबरती
वाडा आहे श्रीमंती तान्हे बाळाचा २५३
तान्हीया बाळाला कोणी ग काय केले
कडू मी भरवले मायफळ २५४
तान्हीया बाळाला कोणी ग काय केले
रागानें धाडीलें निजावया २५५
तान्हीया रे बाळा पुरे कर आता रडे
दारीचे घेवडे जून झाले २५६
माझे तान्हे बाळ मला ते आवडे
दारीचे घेवडे जून झाले २५७
बाळा तुझी झोप कावळयाने नेली
सारी रात्र गेली आंदुळता २५८
कांग हें रडते तान्हे बाळ आज
त्याला आधी पाज सूनबाई २५९
तान्हे बाळ रडे उगी ना मुळीं राही
त्याला आधी घेई माउलीये २६०