तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 10
जाईन सातार्या पाहीन सज्जनगड
चढण नाही अवघड माणसाला ८१
जाईन सातार्या पाहीन सज्जनगड
पाहीन कावड कल्याणस्वामींची ८२
जाईन सातार्या पाहीन माहुली
तेथें वाहते माउली कृष्णाबाई ८३
जाईन सातार्या माऊली पाहीन आधीं
तेथे ग कुत्र्याची आहे पवित्र समाधी ८४
जाईन सातार्या माउली पाहीन
संगमी न्हाईन कृष्णाबाईच्या ८५
जाईन सातार्या माउली पाहीन
देवी अहिल्याबाईने मंदिर ठेविले बांधून ८६
जाईन सातार्या पाहीन सज्जनगड
समर्थाची ग समाधी पाहून तरती दगड ८७
पुण्याची थोरवी सातारा नुरवी
सर्वांना हारवी कोल्हापूर ८८
आळंदीला शोभा इंद्रायणीच्या पुलानें
समाधी घेतली बारा वर्षांच्या मुलानें ८९
आळंदीला आहे भिंत सामक्षेला
सांगते सर्वाला गर्व नको ९०
आळंदीला जावे जीवें जीवनमुक्त व्हावे
तेथे श्री ज्ञानदेवें दिव्य केले ९१
देहूला जाऊन देह विसरावा
अंतरी स्मरावा तुकाराम ९२
देहूला जाऊन देह विसरू या
ओवियां गाऊं या तुकाराम ९३
देहूला राखीले पाण्यांत अभंग
अभंग भक्तिरंग तुकोबांचा ९४
देहूचा अणूरेणू गर्जे विठ्ठल विठ्ठल
लोकां उध्दरील क्षणामाजी ९५
चिंचवड क्षेत्री मोरया गोसावी
त्याची ओवी गावी विसरू नये ९६
आधी नमन करूं चिंचवडीच्या मोरया
सुरूच्या समया तेवताती ९७
सहज मी उभी होत्ये मनांत ये कल्पना
नित्य जावें दर्शना मोरयाच्या ९८
भार्गवराम देवाजीची पायठणी अवघड
येथून पायां पड गोपूबाळा ९९
वाजंत्री वाजवी बाणगंगेच्या धक्यावरी
परशुराम सख्यावरी अभिषेक १००