ऐतिहासिक व देशाच्या 10
बाळ गंगाधर दत्ताचा अवतार
देशाचा कारभार घेई माथां ६१
कां ग सखी गर्दी काल जाहली रस्त्यांत
मिरवणूक होती येत टिळकांची ६२
पहिली माझी ओवी जगाच्या पालका
रक्षी टिळक बालका रात्रंदिवस ६३
पैसेवाला मोठा मुंबईचा टाटा
तेणें मुळशी पेटा बुडवीला ६४
पैसेवाला मोठा मुंबईचा टाटा
मुळशीवर वरंवटा फीरवीला ६५
पैसेवाला मोठा मुंबईचा टाटा
त्याच्या नाहीं पोटा दयामाया ६६
मुळशीत मोठा मांडीती सत्याग्रह
बुडत्या धरणीला पांडुरंग वराह ६७
मुळशीच्या सत्याग्रहीं उडे आधणांचे पाणी
परी सत्याग्रही भगिनी मानिती तें फुलावाणी ६८
जिकडे तिकडे जाहलें गांधी गांधी
अंगावर साधी खादी घालतात ६९
जिकडे तिकडे जाहले गांधी गांधी
तुरुंगी राजबंदी लाखों जाती ७०
गांधी हा गारुडी वाजवीतो पुंगी
इंग्रजाला गुंगी तेणे येई ७१
गांधी जादूगार भ्याडा करी धीट
दास्याचा आणी वीट सर्व लोकां ७२
जिकडे तिकडे जाहलें गांधी गांधी
राहणी होई साधी शिकलेल्यांची ७३
कुठें ग चालल्या हजारों या ग नारी
समुद्राचे तीरी सत्याग्रहा ७४
चुलीपाशी आला गांधींचा सत्याग्रह
इंग्रजाला शह घरींदारी ७५
कुठें या चालल्या हजारो आयाबाया
बंद मीठ लुटावया इंग्रजांचे ७६
कुठे या चालल्या बायका गाणी गात
सत्याग्रह चळवळीत उडी घ्याया ७७
बाया झाल्या धीट त्यांची गेली भीती
हातांत झेंडा घेती स्वराज्याचा ७८
दूरच्या तुरुंगांत भगतसिंगा फांशी देती
गांधी चळवळ करिती स्वराज्याची ७९
पालगड गांवांत काँग्रेसची भरली सभा
तेथें राहे हिरा उभा पंढरीनाथ ८०
पालगडच्या गणपतीला बदामाचा शिरा
पालगड गांवचा हिरा पंढरीनाथ ८१
माझ्या अंगणात हिरवा भाजीपाला
खादीचा टोपीवाला भाईराया ८२
गांधींची चळवळ मुलाबाळां बायकांची
भीती जाईल सर्वांची मनातील ८३
उठली मुलें बाळें त्यांना भीति कशी नाहीं
वंदे मातरं दिशा दाही घुमतसे ८४
एक देणारे स्वातंत्र्य प्रिय देशा हिंदुस्थाना
देई उदंड आऊक्ष देवा महात्मा गांधींना ८५