देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 8
देवादिकांच्या व पौराणिक : ओव्या
आधी नमन करू देव गणपति
शारदा सरस्वती मोरावरी १
मोरया रे देवा तुला दुर्वांची आवडी
एकविसांची जुडी बाळासाठी २
मोरया रे देवा लाडू घे सोंडेवरी
पुत्र दे मांडीवरी उषाताईला ३
मोरया देवाला केलें दुर्वांचे आसन
झाला मोरया प्रसन्न भाईरायाला ४
मोरया रे देवा तुला लिंपीन शेंदूर
पुत्र तूं दे सुंदर उषाताईला ५
मोरया रे देवा तुला जास्वंदीचे फूल
मांडीये देई मूल उषाताईला ६
मांडीये देई मूल सारी विघ्ने ही हाकावी
तान्हे बाळीला राखावी दूरदेशी ७
मोरया रे देवा सारी विघ्ने कर दूर
निर्विघ्न माझा कर संवसार ८
आणा गणेशाला गणेशचतुर्थीला
देईल सद्बुध्दीला तान्हे बाळा ९
आणावा गणेश त्याचा मांडला सोहळा
देईल विद्येला तान्हेबाळा १०
आणावा गणेश विघ्नें तो करी दूर
सुखाला येवो पूर गोपू बाळाच्या ११
आणावा गणेश त्याला वाहूं हिरव्या दुर्वा
प्रार्थू मनोरथ पुरवा गणराया १२
आणावे नारळ करीन एकवीस मोदक
देव सिध्दीविनायक कृपा करो १३
संकष्ट चतुर्थी आहे माझा नेम
भाचा सांगेन ब्राह्मण गोपू बाळा १४
संकष्ट चतुर्थी चंद्र दिसतो हिरवा
सखी वेंचते दुरवा पूजेसाठी १५
सर्वांच्या मागून शिवाची करिती पूजा
भोळ्या सांबालागी माझा प्रणिपात १६
खोलामध्ये नांदे नाही त्याचा गाजावाजा
भोळ्या सांबा माझा नमस्कार १७
रानीवनी वसें माझा कैलासीचा राजा
भोळ्या सांबालागी माझा प्रणिपात १८
स्मशानी वसती अंगाला विभूति
पती तो पार्वती वरीतसे १९
सर्पाची वेटोळी ज्याच्या गळां वेढे देती
पति तो पार्वती वरीतसे २०