सुखदु:खाचे अनुभव 24
काळी चंद्रकळा जशी काजळाची वडी
त्याची आज घडी मोडी उषाताई २६१
काळी चंद्रकळा ठेवून ठेवून नेसावी
सार्या जन्माला पुरवावी उषाताई २६२
काळी चंद्रकळा नेसता लागे मऊ
भूषणाजोगे भाऊ राज्यधर २६३
काळी चंद्रकळा कशी नेसूं मी एकटी
माझी बहीण धाकुटी आहे घरी २६४
काळी चंद्रकळा धुऊन धुऊन वीटली
नाही ग हौस फीटली उषाताईची २६५
काळी चंद्रकळा धुऊन धुऊन झाला बोळा
रुपये दिले साडेसोळा बाप्पाजींनी २६६
काळी चंद्रकळा धुऊन धुऊन झाला कचरा
रुपये दिले साडेसतरा काकारायांनी २६७
काळी चंद्रकळा ठेवीली भुईवरी
रुसली आईवरी उषाताई २६८
काळी चंद्रकळा ठेवीली बाकावरी
रुसली काकावरी उषाताई २६९
काळी चंद्रकळा ठेवीली दारावरी
रुसली दीरावरी उषाताई २७०
काळी चंद्रकळा ठेवीली जात्यावरी
रुसली आत्यावरी उषाताई २७१
काळी चंद्रकळा ठेवीली खुंटीवरी
रुसली कंथावरी उषाताई २७२
काळी चंद्रकळा ठेवीली मापावरी
रुसली बापावरी उषाताई २७३
काळी चंद्रकळा दोन्ही पदरीं रामसीता
नेसली पतिव्रता उषाताई २७४
काळी चंद्रकळा जसें काजळाचं बोट
घेणाराचं मन मोठं दादारायाचं २७५
काळी चंद्रकळा जसे रात्रीचे गगन
घेणाराचं मोठं मन दादारायांचे २७६
मला हौस मोठी जरीच्या पातळाची
पेठ धुंडिली साताऱ्याची मामारायांनी २७७
मला हौस मोठी गोटापुढें ग तोड्याची
काळी चंद्रकळा चोळी धोतरजोड्याची २७८
गोटपाटल्यांची घडण सातार्याची
लाडकी भ्रताराची उषाताई २७९
हाती गोटपाटल्या मागे पुढें सारी
तापत्या चोळीवरी बाजूबंद २८०