देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 9
भैरव भुतांची नाचे मंडळी सभेती
पति तो पार्वती वरीतसे २१
हातात डमरू त्रिशूळ दुज्या हाती
पति तो पार्वती वरीतसे २२
नंदीचे वाहन चंद्रमा माथ्यावरती
पति तो पार्वती वरीतसे २३
जगाच्या कल्याणा हलाहल सुखे पीती
पति तो पार्वती वरीतसे २४
जगाच्या कल्याणा विषाचा घोट घेती
नीळकंठ झाली कीर्ति शंकराची २५
भोळा महादेव याला भोळा म्हणूं नये
त्याच्या जटेमध्ये गुपित गंगा वाहे २६
भोळा महादेव भोळे याचे देणे
त्याने मला दिले त्याच्या विभूतीचे सोने २७
भोळा महादेव क्षणीं प्रसन्न होतसे
दुष्ट असो सुष्ट असो वर मागे तो देतसे २८
भोळा महादेव त्याला वहा शिवामूठ
मग संसारी सुखाची उषाताई तुला लूट २९
चिलू माझा वेसारा पापड पसारा
निघाला वेसवारा कैलासांत ३०
चिलू माझा दाणीया भांगी भरल्या गोणीया
निघाल्या पेणीया कैलासांत ३१
त्रिश्चरण चेतविला महानंदा घाली उडी
आला धांवूनी तांतडी महादेव ३२
कुक्कुट मर्कुट महानंदेने पाळीले
भद्रसेनाकडे आले पुत्र दोन्ही ३३
पतिव्रता मोठ्या पार्वती सावित्री
पवित्री धरित्री त्यांच्यामुळें ३४
योगिनी सावित्री यमापाशी गेली
पति घेऊनियां आली स्वर्गातूनी ३५
पतिव्रता सावित्री प्रतिज्ञा करूनी गेली
पति घेऊनिया आली स्वर्गातूनी ३६
योगिनी सावित्री संतोषवी यमराणा
मागते चुडेदाना त्याचेपाशी ३७
सासू-सासर्यांच्या आज्ञे गेली अरण्यांत
जाहली कृतार्थ दोघेंजणें ३८
यमाचे पाशांतून पति सोडवी सावित्री
जगती तिची कीर्ति नारी गाती ३९
पति असे पाशी धैर्य बसे त्याच्यापाशी
नाही झाली गोष्ट अशी भू-मंडळी ४०