तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 13
हरिद्वारची गंगा अत्यन्त पवित्र
तिने माझीं गात्रं शुध्द केली १४१
पवित्र ग स्नान शरयूचे कांठी
माकडांची दाटी तेथे फार १४२
भक्तजन जाती मणिकर्णिकेचे काठी
देऊळांत दाटी विश्वनाथाच्या १४३
विष्णुला आवडे तुळशींचे पान
त्रिवेणी-संगम पाहीयेला १४४
गुलाबाचें फूल गणपतीला आवड
गंगेची कावड रामेश्वराला १४५
येथून नमस्कार पुण्यापासून कलकत्त्याला
मोतीं तुमच्या अडकित्त्याला मामाराया १४६
समुद्राच्या कांठी कोंकण वसलें
सुखानें हांसले नारळींत १४७
समुद्राच्या काठीं कोंकण वसलें
कृष्ण-अर्जुन बैसले रथावरी १४८
कोंकणपट्टीचा रत्नागिरी जिल्हा
जळी स्थळीं किल्ला पहारा करी १४९
पंढरीचा देव अमळनेरा आला
भक्तीला लुब्ध झाला पांडुरंग १५०
कड्यावरचा गणपती मूर्ति आहे मोठी
नित्य चढे घाटी मामाराया १५१
सोमेश्वर देवाजीच्या पाटांगणीं चिरा
लोटांगण घेतो हिरा गोपूबाळ १५२
झोळाई मातेचा आधी घ्यावा कौल
मग टाकावें पाऊल प्रवासाला १५३
पालगड गांवाची किती आहे लांबी रुंदी
स्वयंभू आहे पिंडी शंकराची १५४
देव देव्हार्यांत गणपती गाभार्यांत
पालगड गांवींचा सोमेश्वर डोंगरांत १५५
पालगड गावाला दूरवांचे बन
उत्तम देवस्थान गणपतीचें १५६
काय सांगूं बाई पालगडची हवा
गणपतीला मुकुट नवा उत्सवांत १५७
हळदीची वाटी झोळाईचे हातीं
पालगड गांवची घाटी उतरली १५८
काळकाई महामाई या दोघी ग गांवांत
तिसरी डोंगरांत झोळाई माता १५९
झोळाई मातेपुढे फुलली तगर
पालगड नगर शोभिवंत १६०
माझे दारावरनं कोण गेली सवाशीण
पालगड गांवची मोकाशीण झोळाई माता १६१
रामटेक गडावरी कर्णा वाजे झाईझाई
रामाला सिताबाई विडा देई १६२
खांदेरी उंदेरी या दोघी जावाजावा
मध्ये ग कुलाबा हवा घेई १६३