सुखदु:खाचे अनुभव 12
माझे ग मायबाई नको करूं माझा घोर
रत्न दिलेंस तू थोर लेकीहाती २१
बाप्पाजी हो बाप्पा मी तुमच्या पोटीची
मला कोणत्या गोष्टीची चिंता नाही २२
बाप्पाजी हो बाप्पा आम्ही तुमच्या कीं पोटा
लेकासारखाच वांटा आम्हा द्यावा २३
चंदनासारखी देह मी झिजवीन
लेक तुमची म्हणवीन बाप्पाराया २४
चंदनासारखी देह घालीन करवती
तुमच्या नांवासाठी बाप्पाजी हो २५
इवलाही बोल मला लागू न देईन
लेक तुमची म्हणवीन बाप्पाराया २६
माझे ग मायबाई नको करूं माझी चिंता
दिलीस भाग्यवंता लेक तुझी २७
सासुरवाशिणीचें तोंड का कोमेजलें
कोण कडू हो बोललें उषाताईला २८
भूक लागे माझ्या पोटा परवंटा देत्यें गाठी
तुमच्या नांवासाठी बाप्पाजी हो २९
लेकीचा हा जन्म देव घालून चुकला
बैल घाण्याला जुंपला जन्मवेरी ३०
स्त्रियांचा हा जन्म नको घालूं सख्या हरी
परक्याची ताबेदारी जन्मवेरी ३१
स्त्रियांचा हा जन्म नको घालूं सख्या हरी
रात्र ना दिवस परक्याची ताबेदारी ३२
सासुरवाशिणी तूं ग वाडयातला बैल
कधीं रिकामी होशील उषाताई ३३
नाचण्याचा कोंडा नाही कशाच्या काजाकामा
मुलगीचा जन्म रामा देऊं नये ३४
सकाळी उठून काय म्यां काम केले
वृंदावन सारविलें तुळशीचें ३५
सकाळी उठून काम सडा-सारवण
दाराशी राहती उभे देव सूर्यनारायण ३६
सकाळी उठून गायीच्या गोठया जावें
पवित्र नांव घ्यावे गोविंदाचे ३७
सकाळी उठून लागल्ये कामाला
माझा निरोप रामाला नमस्कार ३८
सकाळी उठून मुख पहावें गायींचे
दारी तुळशीमाईंचे वृंदावन ३९
सकाळी उठून देवापुढें सारवींले
रांगोळीने काढीयलें रामनाम ४०