सुखदु:खाचे अनुभव 16
देवाच्या देऊळी उभी मी केव्हाची
वाट बघते ब्राह्मणाची पूजेसाठी १०१
अश्वत्थाचा पार कुणी झीजवीला
पुत्रासाठी नवस केला उषाताईनें १०२
पिंपळा प्रदक्षिणा कोण घालीते एकली
आहे पुत्राची भुकेली उषाताई १०३
नवस मी केला अंबाबाईला पाळणा
पुत्र होऊं दे खेळणा उषाताईला १०४
देवाच्या देऊळी पुत्रांचे पर्वत
एक द्यावा हो त्वरित उषाताईला १०५
नारायण देवाजीचा झाडीत होत्यें जामदारखाना
सांपडला मोतीदाणा गोपूबाळ १०६
नारायण देवाजीचा झाडीत होत्यें पलंगपोस
सांपडला मोतीघोंस गोपूबाळ १०७
लाखावरी सावकार तुझ्या माडीला आरसे
पोटीं नाही पुत्रफळ झाले द्रव्याचे कोळसे १०८
लाखावरी सावकार तुझ्या ओसरी दिवा जळे
पोटी नाही पुत्रफळ तुझ्याओटीवर कोणखेळे १०९
वाजंत्री वाजती कोणत्या आळीला
ताईबाई सावळीला न्हाण आलें ११०
देवाच्या देवळी मोकळया केसांची
न्हालेल्या दिवसांची उषाताई १११
पहिल्याने न्हाण न्हाण आलें ते आजोळी
मखराला जाळी मोतीयांची ११२
पहिल्याने न्हाण हिरव्या साडीवरी
मखर माडीवरी घालतात ११३
पहिल्या न्हाणाची सासू करीतसे हौस
सखे मखरी तूं बैस उषाताई ११४
पिवळे पातळ साळयाला सांगितलें
न्हाण आले आईकलें उषाताईला ११५
केळी कंडारल्या तेथें कां ग उभी
पहिल्या न्हाणाजोगी उषाताई ११६
पहिले न्हाण आलें आले तें सासरा
केळी घाडिल्या उशीरा मखराला ११७
पहिल्याने न्हाण आलें हांसतां खेळतां
मखर गुंफितां रात्र झाली ११८
पहिल्याने गर्भार हिरवा शालू घेऊं
बागेमध्ये नेऊं उषाताईला ११९
पहिल्याने गर्भार नारळी हिचें पोट
डाळिंबी नेस चीट उषाताई १२०