संकीर्ण 6
सरलें दळण दळून दमलीस
सीतेलाही होई संसारीं वनवास २१
सरलें दळण घालूं शेवटचा घास
असाच हात लावी शेजी तुझी मला आस २२
सरलें दळण राहिला राइरा
विठ्ठल सोयरा पंढरीचा २३
दळण मी दळी पीठ आलें मोदकाचें
जेवण वैदिकांचे पांडुरंग २४
दळण दळत्यें उरला चाराचुरा
मोत्याचा लावूं तुरा विठ्ठलाला २५
दळण दळत्यें दळत्यें रवा-पिठी
पाहुणे जगजेठी पांडुरंग २६
भुकेला ब्राह्मण सांगतें ऐक खूण
माडीवरी वृंदावन तुळशीचें २७
भुकेला ब्राह्मण पोटाला हात लावी
दुरून घर दावी भाईरायाचें २८
भुकेला ब्राह्मण कोरण मागतो डाळीचें
घर लेंकूरवाळीचें उषाताईचें २९
काशीस मी गेल्यें काशीकर झाल्यें
कागद धाडीयेले गांवोगांव ३०
देवा मी दुबळी नेसेन धाबळी
येईन राऊळी तिन्हीसांजा ३१
देवा मी दुबळी वारियानें जातें
आधार तुझा घेतें पांडुरंगा ३२
झोळाईला पातळ सोमजाईला झुण्णा
या दोघी सास्वासुना वावरती ३३
वाटेवरला आंबा मोहरानें डुले
कोलानें बोले जोगेश्वरी ३४
नणंदा वन्संबाई आपुला मान घ्यावा
मला आशीर्वाद द्यावा चुडेयांना ३५
चैत्र मासीच्या रांगोळ्या प्रकारांच्या
नणंदा झण्कार्याच्या उषाताईंच्या ३६
माझ्या धावण्याला तुम्ही धांवा जगजेठी
द्रौपदीबाई मोठी मी तो बहीण धाकुटी ३७
माझ्या धावण्याला तुम्ही धांवा चक्रपाणी
तुमच्यावरून माझा देह ओवाळणी ३८
दुरून दिसते तातोबाची माडी लाल
सीताबाई बाळंतीण शालीचे दिले पाल ३९
वाजंत्री वाजती नदीच्या तीरावरी
देवा महादेवावरी अभिषेक ४०