देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 18
देवाची यशोदा नेसली पीवळें
मांडीये सावळें परब्रह्म २०१
दैवाची यशोदा नेसली शेलारी
बैसली श्रीहरी दूध पाजू २०२
दैवाची यशोदा नेसली पातळ
मांडीये घननीट नाचतसे २०३
कृष्णाची यशोदा नेसली जरतारी
मांडीये मुरारी दूध पीई २०४
यशोदेच्या निर्या कृष्ण धरून उभा राही
चंद्रमा म्हणे देई खेळावया २०५
गायींना चारीतो यमुनेच्या तटीं
भक्तांना संकटी सांभाळीतो २०६
कृष्ण टाकी उडी कळंब कडाडला
शेष दणाणला पाताळांत २०७
कृष्ण उडी टाकी कळंबाच्या मेजें
यमुने पाणी तुझें गढूळले २०८
गायीगुरे चारी वाजवितो पांवा
गोपाळकृष्ण घ्यावा गोकुळींचा २०९
खांदीये घोंगडी अधरी धरी पांवा
गोपाळकृष्ण गावा गोकुळीचा २१०
हाती शोभे काठी गवळे सवंगडी
खांदीये घोंगडी कृष्णजीच्या २११
मोरमुगुट माथां गळां वनमाळा
स्मरावा सांवळा गोकुळीचा २१२
गोपाळकाला करी यमुनेच्या तीरी
होऊन गोवारी नंदजीचा २१३
दैवाचा तूं नंद धन्य दैवाची यशोदा
आनंदाच्या कंदा खेळवीले २१४
जयाच्या नांवे होती संसारात मुक्त
यशोदा बांधीत तयाला दावें २१५
राक्षस संहारी काळीच्या बिहारी
यशोदा त्याला मारी वेताटीने २१६
तोंडांत दाखवी विश्व ब्रह्मांड सगळें
तेव्हां यशोदे कळलें बाळरूप २१७
कृष्णें काळीयाची मर्दीयेली फणी
काढीयला मणी मस्तकींचा २१८
गोविंद गोविंद गोविंद ध्यानी मनी
गोविंद गोपांगणी क्रीडा करी २१९
वाजवून पांवा वेध लावी सर्वां
गोपाळकृष्ण घ्यावा गोकुळींचा २२०