सुखदु:खाचे अनुभव 14
सोनाराच्या शाळे खुट्टू खुट्टू वाजे
नवा बिंदीपट्टा साजे वैनीबाईला ६१
पायांत तोरड्या नवी नवरी कोणाची
सखा शाळे जातो त्याची गोविंदबाळाची ६२
हातींच्या पाटल्या मागे पुढे सारी
गोटांना जागा करी उषाताई ६३
हाती गोट पाटल्या हातरींच्या वांकी
आपण गृहस्थाच्या लेकी उषाताई ६४
आले हो वैराळ बसूं घालावा कांबळा
चुडा भरा जांभळा उषाताईला ६५
आले हो वैराळ बसूं घालावी घोंगडी
चुडा भरा नागमोडी सूनबाई ६६
आले आले पटवेकरी पटवाया काहीं नाही
पटवा सूनबाई तुझ्या पेट्या ६७
आले आले पटवेकरी पटवाया काय देऊं
बाजूबंद गोंडे लावूं सूनबाईच्या ६८
आले आले पटवेकरी नको घेऊं मुली छंद
पटव बाजूबंद सूनबाई ६९
आले आले पटवेकरी नको घेऊं मुली चाळा
पटव तुझ्या माळा उषाताई ७०
माझ्या अंगणांत सासूबाईचा ठेवारेवा
सीतेसारख्या आम्ही जावा चौघीजणी ७१
गोटपाटल्यांच्या या मुली ग कोणाच्या
माझ्या ग मायबाईच्या लेकीसुना ७२
घराची घरस्थिती काय पाहाशी परक्या
लेकीसुना त्या सारख्या माझ्या घरीं ७३
लेकी-सुना घेऊन नको बसूं तूं अंगणीं
दृष्ट लागेल म्हणुनी अक्काबाई ७४
माझ्या दारावरनं हत्ती गेले एकदोन
पालखीत लेकसून मायबाईची ७५
माझ्या अक्काबाईची वडील सून कोण
कारल्याची खूण शांताबाई ७६
सासूबाई तुम्ही एक हो बरें केलें
कपाळीचें कुंकू रत्न माझ्या हातीं दिले ७७
सासूचा सासुरवास सारा मनांत गिळीतें
कंठाशी हांसते उषाताई ७८
माझे सारें दु:ख मी ग मनांत ठेवीन
कंथाला पाहून गोड गोड मी हांसेन ७९
होवो माझे कांही मला नाही त्याची पर्वा
माझा कंथ ग रहावा आनंदात ८०