मायलेकरे 9
बाळ विचारतो, “आई, तू मारीत नाहीस. बाबा का मारतात ?”
आई तूं मुका घेशी बाबा का बोलताती
पुत्र होवो वाचस्पती म्हणूनीयां ॥
आई तूं मायेची बाबा का कठोर
लेकाने व्हावें थोर म्हणूनीयां ॥
पित्याचा मोठेपणा मुलाच्या मनावर माता ठसवीत आहे. तिरुक्कुरल अथवा तामीळ वेद म्हणून एक प्रसिध्द तामीळ ग्रंथ आहे. त्यात म्हंटले आहे, “बापाची पुत्रासंबंधी इच्छा काय असते ? तू कोणाचा मुलगा असे सभेत पंडितांनी कौतुकाने मुलाला विचारावे अशी असते.”
मुलाने शहाणे व्हावे, विद्वान व्हावे असे बापाला वाटते. पित्याची इच्छा पूर्ण कर, असे माता त्याला सांगत असते. पाहुणे घरी आले तर त्यांना श्लोक म्हणून दाखव, त्यांची शाबासकी मिळव असे ती सांगते :
पाहुणे घरी आले सांग त्यांना नांव नीट
नको लाजूं होई धीट तान्हेबाळा ॥
पाहुणे घरी आले करितील तुझी स्तुति
अशी करावी हो कृती तान्हेबाळा ॥
पाहुणे नाना प्रकारचे असतात. एकदा एक नवखे गृहस्थ घरी आले. बाळ विचारतो :
कोण बागुलबोवा बैसला माये ओटी
काका आले तुझ्या भेटी तान्हेबाळा ॥
उत्तर-रामचरित्र नाटकात वाल्मीकीच्या आश्रमात वसिष्ठ ऋषी आलेले असतात. तेव्हा एक शिष्य मोठया मित्राला विचारतो, “कोण रे तो वाघोबा आला आहे ?” त्याची आठवण होते येथे. परंतु ही पुढील मजेची ओवी ऐका :
मोठया मोठया मिशा भली मोठी शेंडी
होतसे घाबरगुंडी तान्हेबाळाची ॥
काय रे झालें बाळा कांही नाही घेता मुका
रुतती दाढीमिशा काकाजींच्या ॥
आपला बाळ घरकोंबडा व्हावा असे आईला वाटत नाही. त्याने बाहेर जावे, खेळावे, धीट व्हावे, असे तिला वाटते. परंतु बाळ काय बोलतो ते ऐका :
बाहेर बाळा जाई लपंडाव खेळे
कुसकरती माझे डोळे माउलीये ॥
बाहेर तूं जाई खेळ खेळ रे लंगडी
आई दुखते तंगडी खरोखर ॥
बाहेर तूं जाई खेळ हमामा हुतूतू
आई खेळूं मी तूं घरामध्ये ॥