मायलेकरे 23
लहान लहान मुले खेळती हुतूतू
दमली परंतु तान्हेबाळ १८१
माझ्या अंगणात बांधिलासे झोका
तेथें खेळवा बाळका गोपूबाळा १८२
माझ्या अंगणात घातला मांडव
तान्हेबाळाला खेळव साउलींत १८३
माझे दोन्ही बाळ दुपारीं कोठें गेले
उन्हानें कोमजले नागचाफे १८४
कोकंब पिकले पिकलें लाल लाल
खेळून तसे झाले तान्हेबाळाचे ग गाल १८५
उन्हाळयाचे ऊन ऊन लागते पाठीला
कंठी शोभते छातीला तान्हेबाळाच्या १८६
उन्हाळयाचे ऊन ऊन लागते गालाला
कंठी शोभते कंठाला तान्हेबाळाच्या १८७
दुपारचें ऊन टाळू तुझी रे तापली
उघड छत्री रे आपली तान्हेबाळा १८८
करवंदी काळया झाल्या लाल पिवळे काजू
गेलें कोणत्या हो बाजू तान्हेबाळ १८९
रानींवनीं किती भारावल्या बोरी
आणिती रानमेवा तान्हेबाळाला गोवारी १९०
रानीचा तो मेवा रानींच्या पाखरांना
दुधाच्या चारी धारा गायीच्या वासरांना १९१
बाळारे बागड शिवीन आंगडे
बिंदीये उघडे जाऊं नये १९२
गायीच्या गोठयांत सर्पाची वेटोळी
तेथे तुझी चेंडूफळी तान्हेबाळा १९३
आणतें चेंडूफळी सर्पाच्या जवळून
सर्प भुले सर्पपण मातेसाठी १९४
गायीच्या गोठयांत वाघ हंबरला
शेष दणाणला पाताळांत १९५
गायीच्या गोठयांत वाघ हंबरतो
बाळ दचकतो पाळण्यांत १९६
तान्हेबाळ खेळे विंचवाच्या संगे
त्याचे विष भंगे बाळापुढे १९७
माझ्या अंगणात पांचफणी नाग डोले
त्याच्या संगे खेळे तान्हेबाळ १९८
तान्हे बाळ खेळे अंगण झाले थोडे
लाविली फुलझाडे काकारायांनी १९९
सोन्याचा विटीदांडू भिंतीशी उभा केला
खेळणारा कोठे गेला गोपूबाळ २००