मायलेकरे 28
दह्यादुधी भरल्या वाटया वर साखरेची मूठ
छंदखोर बाळा उठ जेवावया २८१
दह्यादुधी भरल्या वाटया वर साखर मावेना
छंदखोर हा जेवेना गोपूबाळ २८२
बापाचा लाडका साखर तोंडी लावी
चुलत्यापुढे जेवी तान्हेबाळ २८३
बापाचा लाडका चुलत्याच्या कडे
तबकी दूध पेढे तान्हेबाळा २८४
माझ्या अंगणात ठेवीला दहीभात
जेवीला रघुनाथ तान्हेबाळ २८५
लाडका ग लेक भूक म्हणून नीजला
माझ्या राजसाचा तूप बत्तासा थीजला २८६
वाटीयें दूध तूप निवत मी घाली
लहान बाळा हांका मारी उषाताई २८७
लोकांची ती मुले खाती ताकवण्या
तुझ्या ताटी साखरफेण्या तान्हेबाळा २८८
लोकांची ती मुलें खाती ताकभात
तुझ्या हाती लाडूं नित्य तान्हेबाळा २८९
तान्हे ग बाळाला गोडसे जेवण
दुधाला विरजण साखरेचे २९०
हाती दूधभात वर पेरते साखर
तुझे जेवण प्रकार तान्हेबाळा २९१
अंगणात गाय दाखवीते माय
गोड घास खाय तान्हेबाळा २९२
बघ रे चिमणी करिते चीव चीव
म्हणते तुला जेव तान्हेबाळा २९३
दाखवी पाखरे चुटक्या वाजवी
माउली जेववी तान्हेबाळा २९४
माझे तान्हे बाळ मोठया ग मानाचे
त्याच्या जेवणाचे नाना रंग २९५
आळवून किती भरविते घांस
माऊलीला त्रास नाही त्याचा २९६
तान्हेबाळ खेळे आंगण ओसरी
त्यांत संगत दूसरी ताईबाईची २९७
पाऊस पडतो मृगाआधी रोहिणीचा
पाळणा हालतो भावाआधी बहिणीचा २९८
समोर पाळणा हलग्यांशी ग हालतो
बाळ बापाशी खेळतो आनंदाने २९९
पिवळा पीतांबर कांठी कमळाचा
कडे नातू घ्या जावळाचा गोपूबाळ ३००