परिक्षिताचा अंत
पांडवांनी परिक्षितावर राज्य सोपवून स्वर्गारोहण केले. परिक्षित अभिमन्यू व उत्तरा यांचा पुत्र. याचा मृत्यू तक्षकाचा दंश होऊन विचित्र तर्हेने झाला. त्या परिक्षिताच्या पुत्राने, राजा जनमेजयाने, क्रोधाने सूड घेण्यासाठी सर्पसत्र केले. त्या सर्पसत्रात वैशंपायन यांनी त्या राजाला महाभारत ऐकविले. सर्पसत्राचे कारणच मुळी परिक्षिताचा मृत्यू असल्याने त्यासंबंधीची कथा आदिपर्वात सांगितली आहे. सर्पसत्राच्या वर्णनानंतर संभवपर्वात कौरवपांडवांच्या जन्माचे वर्णन आले आहे. वास्तविक परिक्षित अर्जुनाचा नातू. पण त्याच्या निधनाची ह्रदयद्रावक कथा अशी पहिल्या पर्वातच आली आहे. परिक्षित राजा धर्मशील थोर राजा होता. तो एकदा मृगया करीत असताना मृगाचा पाठलाग करीत असता थकून जातो. तहानेने व्याकुळ झालेला तो राजा एका आश्रमात जाऊन ध्यानस्थ मुनीला, शमीकाला मृगासंबंधी विचारतो. मुनीने मौनव्रत धारण केलेले असते म्हणून तो काही बोलत नाही. राजा रागाच्या भरात एक मृत सर्प त्याच्या गळ्यात टाकून निघून जातो. नंतर तेथे आलेला मुनींचा पुत्र शृंगी राजा परिक्षिताला शाप देतो की तक्षकदंशाने सात दिवसाच्या आत राजा मरण पावेल. शमीकाने राजाला जागृत केलेले असले तरी शेवटी तक्षकाच्या दंशाने राजाचे निधन होते !
परिक्षिताचा अंत
परिक्षित राजगुणांनी ख्यात
सौभद्राच्या सुता अकाली निधन परी नशिबात ॥धृ॥
प्रजाहितास्तव सदैव झटला
शिखरि बसविले हस्तिनापुरा
लोक प्रशंसिति हा तर दुसरा धर्मपरायण पार्थ ॥१॥
पांडूसम हा श्रेष्ठ धनुर्धर
मृगयेसाठी गेला नृपवर
विद्ध मृगाच्या मागे धावत थकला गहन वनात ॥२॥
तृषार्त तो ये स्थानी एका
दिसला का मृग पुसे शमीका
शब्द न वदला मुनी तयासि, होता मौनव्रतात ॥३॥
पुन्हा पुसे, परि मुनी ध्यानरत
क्रोधाने त्या पाहि परिक्षित
मृतसर्पाला उचलुन टाके कोपे मुनि-कण्ठात ॥४॥
राजा निघता, शृंगी येई
पुत्र तपस्वी पित्यास पाही
सहवेना अवमान गुरूचा, शाप देइ क्रोधात ॥५॥
"निंद्य कृत्य हे केले ज्याने
मरेल पापी नागविषाने
तक्षक नागाच्या दंशाने सप्ताहाच्या आत" ॥६॥
"शापिले का? तो नृप अपुला
नव्हता जाणत मौनव्रताला
सावध करितो त्या भूपाला "शमिक वदे दुःखात ॥७॥
वैद्य मांत्रिकासह तो जपुनी
वसे भूपती रक्षित स्थानी
दिनी सातव्या काश्यप मांत्रिक येइ शीघ्र नगरात ॥८॥
वाटेतच त्या तक्षक अडवी
वित्त देउनी परत पाठवी
सूक्ष्म अळीचे रूप घेउनी करि राजाचा घात ॥९॥
बोर घेतले नृपाने
अळी त्यातुनी पडली खाली
तिचाच झाला भुजंग त्याने केला दंश क्षणात ॥१०॥
सैरावैरा सर्व धावले
शब्द मुनीचे सत्यच ठरले
करुण अंत हा कळता बुडले राजनगर शोकात ॥११॥