विदुराचा अंत
व्यास, अर्जुन, भीम या सर्वांनी युधिष्ठिराचे मन वळविले. राज्य ग्रहण केल्यानंतर युधिष्ठिराने भीष्मांची रोज भेट घेऊन त्यांच्यापासून धर्म, नीती, व्यवहार व तत्त्वज्ञान यांचे ज्ञान घेतले. त्याने धृतराष्ट्र, विदुर इत्यादी ज्येष्ठांची चांगली सेवा केली व आपल्या श्रेष्ठ गुणांनी प्रजेचेही उत्तम पालन केले. पंधरा वर्षानंतर धृतराष्ट्राला जरा उद्वेग वाटला म्हणून तो गांधारी, कुंती, विदुर व संजय यांच्यासह तपासाठी वनात राहायला गेला. एक वर्षाने पांडव त्यांना भेटण्यासाठी वनात गेले. त्यांना चिंता वाटू लागली की हे वृद्ध वनात कसे दिवस काढत असतील. वनातील आश्रमात खडतर व्रते व तपाचरण करून धृतराष्ट्रादी चौघेही कृश झाले होते. पांडवांनी प्रणाम करुन खुशाली विचारली. तेथे व्यास प्रकट झाले व त्यांचा सुखसंवाद झाला. विदुर दिसला नाही म्हणून युधिष्ठिराने चौकशी केली. त्याला कळले की तो जास्त काळ एकटाच वनात भ्रमण करीत असतो. युधिष्ठिर त्याला पहायला निघाला. दूरवर अत्यंत कृश असा विदूर त्याला वृक्षाला टेकलेला दिसला. 'मी युधिष्ठिर', असे म्हणून धर्म त्याच्यासमोर जाऊन उभा राहिला. विदुराने त्याच्याकडे एकटक पहात तेथेच प्राण सोडला.
विदुराचा अंत
चिंता करिती पार्थ ही मनी
वृद्ध राहती कसे काननी? ॥धृ॥
धृतराष्ट्राचे वय हे झाले
पुत्रशोक गांधारिस जाळे
कुंति विदुर परि त्यास सावरे
काळ तपातच जाइ प्रतिदिनी ॥१॥
राज्यसुखांना वंचित सगळे
झेलित होते वादळ वारे
दिवस चालले विजनामधले
धर्म व्यथित परि कुंतिवाचुनी ॥२॥
पार्थ पातले आश्रमदेशी
रथा सोडुनी होत पदाती
विनयाने धृतराष्ट्रा नमती
कुंति भेटता अश्रु लोचनी ॥३॥
सुखी असे ना जीवन इथले?
तपात तुमच्या विघ्न न कसले?
नका कष्टवू शरीर अपुले
धर्म घेतसे कुशल जाणुनी व४॥
विदूर त्यासी कुठे दिसेना
राजा सांगे त्या सर्वांना
तपात राही, दिसे ना कुणा
आहाराविण फिरे या वनी ॥५॥
धर्म निघाला शोधित त्याला
वृक्षवेलितुन अवचित दिसला
हाक दिली त्या थांबायाला
उभा राहि तो तरुस टेकुनी ॥६॥
धर्मराज सामोरा जाइ
अनिमिष नेत्रे विदूर पाही
नजर स्वये नजरेला मिळवी
क्षण हा अंतिम घेइ जाणुनी ॥७॥
त्याच्या गात्री निजगात्रांनी
प्रवेश केला निजप्राणांनी
धर्मामध्ये तेज अर्पुनी
प्राणहीन तो पडे तत्क्षणी ॥८॥
तेज जाणवे युधिष्ठिराला
स्नेह आगळा त्याचा स्मरला
घळघ वाहत अश्रूधारा
वृद्धा सांगे वृत्त येउनी ॥९॥
विदुराने इहलोक सोडला
अंश यमाचा विलीन झाला
ज्ञानाचा जणु प्रकाश गेला
अंध होत नृप आज जीवनी ॥१०॥