Get it on Google Play
Download on the App Store

कृष्णशिष्टाई

संजयाने कौरवांना निरोप देताना सांगितले की पांडवांना अनेक राजे येऊन मिळाले आहेत. द्रुपद, कृष्ण व विराट तर आहेतच पण युयुधान, काशीपती, शिशुपालपुत्र धृष्टकेतू, जरासंधपुत्र, कैकेय, शिखण्डी असे अनेक वीर त्यांच्याबाजूने आहेत. हे ऐकल्यावर पांडवांची शक्‍ती खूप वाढल्याचे पाहून धृतराष्ट्राने आपल्या मनातील भय व्यक्‍त केले. त्यावर दुर्योधनाने विरोध करीत म्हटले की पांडवांच्या तुलनेने आपण अतिबलाढय आहोत. भीष्म, द्रोण, अश्वत्थामा, कर्ण, कृप, सोमदत्त, बाल्हिक, शल्य यातला एकेक पांडवांना पुरेसा आहे. यांच्यासमोर पांडवाचा टिकाव लागणार नाही. आपली अकरा अक्षौहिणी सेना आहे तर त्यांची फक्त सात अक्षौहिणी ! भीम अर्जुन यांच्याबद्दल भय वाटण्याचे काही कारण नाही. कर्ण आणि मी त्यांना पुरेसे आहोत. युधिष्ठिर पाच नगरे नव्हे पाच खेडी मागतो आहे याचे कारण काय ? तर तो माझ्या पराक्रमाला, सैन्याला भीतो आहे. कौरवसभेत या चर्चा सुरु असताना कृष्ण हस्तिनापुरासाठी निघाला होता. तो राजाच्या स्वागताची पर्वा न करता विदुरगृही राहिला. विदुराने दुर्योधन राज्य देऊ इच्छित नसल्याचा संकेत कृष्णाला दिला. कृष्ण समेट घडविण्याच्या उद्देशाने आला होता. हा युद्ध टाळण्याचा शेवटचा प्रयत्‍न होता. त्याने सांगितले की कुरकुल हे श्रेष्ठ कुळ आहे; समेट होणे फार आवश्यक आहे. करार पूर्ण झाल्यावर पांडवांना त्यांचे राज्य मिळायला हवे. कुलक्षय व प्राणहानी टाळली पाहिजे. युद्धाचा मार्ग योग्य नव्हे, त्याने प्रजेची होळी होईल. राजकर्तव्य व न्यायाला स्मरुन निर्णय घ्या.

कृष्णशिष्टाई

या कुरुकुळातिल अंत करा कलहाचा

संदेश घेउनी आलो मी शांतीचा ॥धृ॥

सोशिले वनीचे कष्ट राहुनी मूक

धृतराष्ट्रा त्यांनी खूप भोगिले दुःख

पांडवे राखिला मान तुझ्या शब्दाचा ॥१॥

जे राज्य गमविले धर्माने द्यूतात

ते त्यास देउनी होऊ देत समेट

प्रस्ताव मांडतो सभेत मी शेवटचा ॥२॥

जे हितकर दोघा पक्षांना ठरणार

नीतीच्या नियमा धरुन जे असणार

ते नृपा सांगणे हेतू हाच मनीचा ॥३॥

हे कूळ गुणांनी युक्‍त असे विख्यात

परि कपट, वैर जे घडले ते तुज ज्ञात

तू घ्यावा निर्णय सभेत सर्वहिताचा ॥४॥

होतील एक जर धर्म सुयोधन दोन्ही

कुरु-पांडव ठरतिल बलाढय सार्‍या भुवनी

होईल पराजय तुम्हापुढे देवांचा ॥५॥

जो ठरला होता करार त्यासी स्मरुनी

राज्यार्ध पांडवा द्यावा कुरुश्रेष्ठांनी

दोघांनी घ्यावा सुखे भोग पृथ्वीचा ॥६॥

लोभात बुडाला गांधारीचा पुत्र

दुर्वर्तन हेची त्याचे जीवन-सुत्र

सोडून दिला त्या विचार धर्मार्थाचा ॥७॥

हे संकट मोठे उभे ठाकले पुढती

वैराने होइल हानि कुळाची मोठी

तू आवर त्याला, आवर लोभ सुताचा ॥८॥

सत्याची ज्यांना रुची नसे तिळमात्र

मानिती अनर्था अर्थ तुझे रे पुत्र

हे सुयोधना धर, अता मार्ग शांतीचा ॥९॥

धर्माचा भोक्‍ता धर्मतनय गुणवान

तो मागे शांती आज सर्व विसरुन

अन्यथा येतसे प्रसंग तो युद्धाचा ॥१०॥

हे युद्ध नसे रे केवळ बंधूंमधले

चारही दिशातुन लढण्या राजे जमले

हा नाश भयंकर ठरेल पृथ्वीवरचा ॥११॥

मनि माझ्या नाही पक्षपात कुठलाही

शम करण्या पांडव तयार युद्धालाही

स्वीकार शमाचा मार्ग नृपा श्रेयाचा ॥१२॥

द्वेषाच्या सत्वर दूर करा मेघांना

त्या नितळ नभातुन येऊ द्या किरणांना

तो किरण ठरावा युगास या सौख्याचा ॥१३॥

गीत महाभारत

महर्षी व्यास
Chapters
प्रस्तावना व्यासांची संहिता कुरुकुळातील देवव्रत भीष्मप्रतिज्ञा सत्यवतीची चिंता भीष्माचे प्रत्युत्तर व्यासजन्मकथन व्यासांना विनंती गांधारी-विवाह कुंतीचा कर्णासाठी शोक पांडव-जन्मकथन पांडू राजाचे निधन द्रोणांची शिष्यपरीक्षा प्रेक्षणगृह-प्रसंग भीम-विषप्रयोग लाक्षागृहदाह विदुर-संदेश हिडिम्बेचे निवेदन ब्राह्मणाचा निश्चय बकासुरवध द्रौपदीस्वयंवर दुर्योधनाचे बेत कृष्णाची अग्रपूजा दुर्योधन मयसभेत द्यूतप्रसंग द्रौपदी-वस्त्रहरण अनुद्यूत आणि वनवास कुंतीचा शोक द्रौपदीचा संताप द्रौपदी-सत्यभामा-संवाद द्रौपदीचे अपहरण सूर्याचे आवाहन कर्णाचे सूर्यास उत्तर यक्षप्रश्न कीचकवध कृष्ण्साहाय्य संजय-भाषण युधिष्ठिराचा निरोप युधिष्ठिराची चिंता कृष्णाचे उत्तर कृष्णशिष्टाई धृतराष्ट्राचा उपदेश गांधारीचा उपदेश दुर्योधनाचे उत्तर कुंतीचे मनोगत कर्णाचे कृष्णास उत्तर कुंती-कर्ण-संवाद कर्णाचे कुंतीला उत्तर शिखण्डीचे वृत्त भगवंताची अमरवाणी अनन्यभक्‍तीचा मार्ग धर्माला आशीर्वाद भीष्मपतन भीष्म-कर्ण-भेट भीष्मांचा दुर्योधनाला उपदेश अभिमन्यु प्रताप द्रोणनिधन कर्णार्जुनयुद्ध दुर्योधन-कृप-संवाद युद्धाचा अंतिम दिन दुर्योधनाचे पलायन भीम-दुर्योधन-गदायुद्ध दुर्योधनाचे अंतिम शब्द कृष्णाचे सडेतोड उत्तर अश्वत्थाम्याचा कट द्रौपदीचा विलाप गांधारीचा शोक धर्माचा शोक युधिष्ठिराचे मनोगत अर्जुनाचे आवाहन विदुराचा अंत धृतराष्ट्र निधन यादवांचा नाश स्वर्गाकडे प्रयाण स्वर्ग प्रवेश अंतिम गती परिक्षिताचा अंत कृष्णाला अभिवादन आदर्श पुरुष थोर स्त्रिया