Get it on Google Play
Download on the App Store

दुर्योधनाचे पलायन

शेवटच्या दिवशी रणांगणावर हाहाःकार माजला होता. भीमसेनाने धृतराष्ट्राच्या शेवटच्या सुदर्शन नावाच्या पुत्राला शराच्छादित करुन ठार मारले. धृष्टद्युम्नाने दुर्योधनाच्या सैन्याचा फडशा पाडला. दोन घटकापर्यंत पांडवांकडील रथींनी व विशेषतः अर्जुनाने शत्रूच्या सैन्याची कत्तल चालविली. दुर्योधनाकडील एक हजार राजेही या महायुद्धात आतापर्यंत प्राणास मुकले होते. दुर्योधनाने पाहिले की त्याला सहाय्यक असा वीर कोणी उरलेला नाही. घायाळ झालेला दुर्योधन भकास नजरेने रणांगण पहात होता. पांडवांकडेही दोन हजार रथ व सातशे हत्तीदळ राहिले होते. त्यांच्या विजयघोषणा दुमदुमत होत्या. दुर्योधनाने चारी दिशांकडे नजर टाकली व तो रणातून पळून गेला. पायी चालत असलेला राजा संजयाला दिसला. त्याने दुर्योधनाला तीन महारथी जिवंत असल्याचे सांगितले.दुर्योधनाने संजयापाशी आपले दुःख व्यक्‍त केले. धृतराष्ट्रासाठी निरोपही दिला की तो जलस्तंभन विद्येच्या साह्याने डोहात लपला आहे, तसेच तो अत्यंत घायाळ असून जिवंत आहे.

दुर्योधनाचे पलायन

वज्रासम भीमाची कोसळे गदा

नाश बघुनि दुर्योधन खिन्न सर्वथा ॥धृ॥

समराचा अंतिम दिन

तळपत ते भीमार्जुन

देत रिपुस वीरमरण

भीमाने कुरु वधिले वचन पाळता ॥१॥

मद्रपती पडला रणि

नष्टप्राय सैन्य झणि

जीवित ना सुहृद कुणी

कुरुराजा तो जखमी उभा एकटा ॥२॥

युद्धाचा होत कहर

पडति शिरे भूमीवर

आनंदित पांडु-शिबिर

विजयाचा घोष करित वीर नाचता ॥३॥

भयविव्हल दुर्योधन

मृत अश्वा तो सोडुन

पळुन जाइ रणातून

लपण्यास्तव शोधे तो निकटच्या र्‍हदा ॥४॥

हाती गदा असलेला

घायाळही झालेला

संजयास नृप दिसला

क्षीणस्वरे सूत वदे कंठ दाटता ॥५॥

सैन्य नष्ट सर्व रणी

कृतवर्मा कृप द्रौणी

असती जीवीत तिन्ही

आनंदित झाला नृप वृत्त ऐकता ॥६॥

"झालो मी राज्यहीन

आप्त-स्वजन-सुहृदांविण

जीवन हे गमे शून्य

नृप बोले - ’आशा रे खुंटल्या अता ॥७॥

सांग पित्या तू जाउन

बचावलो युद्धातुन

झालो मी निष्कांचन

थकलो मी दुःखभार शिरी वाहता ॥८॥

राहिन मी ह्या र्‍हदात

जलामधे परि जिवंत

जलविद्या मजसि ज्ञात

रक्षिन मी प्राण इथे जळी राहता" ॥९॥

गीत महाभारत

महर्षी व्यास
Chapters
प्रस्तावना व्यासांची संहिता कुरुकुळातील देवव्रत भीष्मप्रतिज्ञा सत्यवतीची चिंता भीष्माचे प्रत्युत्तर व्यासजन्मकथन व्यासांना विनंती गांधारी-विवाह कुंतीचा कर्णासाठी शोक पांडव-जन्मकथन पांडू राजाचे निधन द्रोणांची शिष्यपरीक्षा प्रेक्षणगृह-प्रसंग भीम-विषप्रयोग लाक्षागृहदाह विदुर-संदेश हिडिम्बेचे निवेदन ब्राह्मणाचा निश्चय बकासुरवध द्रौपदीस्वयंवर दुर्योधनाचे बेत कृष्णाची अग्रपूजा दुर्योधन मयसभेत द्यूतप्रसंग द्रौपदी-वस्त्रहरण अनुद्यूत आणि वनवास कुंतीचा शोक द्रौपदीचा संताप द्रौपदी-सत्यभामा-संवाद द्रौपदीचे अपहरण सूर्याचे आवाहन कर्णाचे सूर्यास उत्तर यक्षप्रश्न कीचकवध कृष्ण्साहाय्य संजय-भाषण युधिष्ठिराचा निरोप युधिष्ठिराची चिंता कृष्णाचे उत्तर कृष्णशिष्टाई धृतराष्ट्राचा उपदेश गांधारीचा उपदेश दुर्योधनाचे उत्तर कुंतीचे मनोगत कर्णाचे कृष्णास उत्तर कुंती-कर्ण-संवाद कर्णाचे कुंतीला उत्तर शिखण्डीचे वृत्त भगवंताची अमरवाणी अनन्यभक्‍तीचा मार्ग धर्माला आशीर्वाद भीष्मपतन भीष्म-कर्ण-भेट भीष्मांचा दुर्योधनाला उपदेश अभिमन्यु प्रताप द्रोणनिधन कर्णार्जुनयुद्ध दुर्योधन-कृप-संवाद युद्धाचा अंतिम दिन दुर्योधनाचे पलायन भीम-दुर्योधन-गदायुद्ध दुर्योधनाचे अंतिम शब्द कृष्णाचे सडेतोड उत्तर अश्वत्थाम्याचा कट द्रौपदीचा विलाप गांधारीचा शोक धर्माचा शोक युधिष्ठिराचे मनोगत अर्जुनाचे आवाहन विदुराचा अंत धृतराष्ट्र निधन यादवांचा नाश स्वर्गाकडे प्रयाण स्वर्ग प्रवेश अंतिम गती परिक्षिताचा अंत कृष्णाला अभिवादन आदर्श पुरुष थोर स्त्रिया