विदुर-संदेश
पांडवांची लोकप्रियता एवढी होती की ते वारणावतास जायला निघाले तेव्हा पौरजन त्यांच्या मागे चालत होते. युधिष्ठिराने त्यांना परत पाठविले. विदुराला दुर्योधनाच्या या गुप्त कटाची कल्पना होती. पांडवांवर त्याचा लोभ होता. पांडव जाताना त्याने पांडवांनी स्वतःला तेथे जपावे असे आवर्जून सांगितले. आपल्याला सर्व माहीत आहे हे गुप्त ठेवणे त्याला भाग होते. त्याने पांडवांचे प्राण वाचावे म्हणून केवळ युधिष्ठिराला कळेल अशा म्लेंच्छ भाषेत संदेश दिला. त्या लाक्षागृहाच्या आतील दालनातून मोठे भुयार खणून निसटावे व आगीपासून प्राणरक्षण करावे असा तो संदेश होता. कुंतीला व इतरांना त्या संवादाचा अर्थ कळला नाही. विदुराने योग्यवेळी आपला सेवक खनक म्हणून पाठवला व त्याने गुप्तपणे भुयार खणले. पुरोचन भवनाला आग लावण्याची संधी पाहात होता. एका सायंकाळी एक निषाद स्त्री पुत्रांसह तेथे आश्रयाला आली. त्या निषादांनी मद्य घेतल्याने ते गाढ झोपले. भीमाने ही वेळ साधून भवनाला आग लावली व पांडव तेथून निसटले. पांडव वाचले ते केवळ विदुरसंदेशामुळे !
विदुर-संदेश
हे युधिष्ठिरा मज कळले कारस्थान
ही आहे फसगत, नाहि तुला रे भान ॥धृ॥
हा दुष्ट सुयोधन पाहि तुला पाण्यात
गुणगान ऐकता तुझे, होइ संतप्त
युवराज पदाची पाहतसे तो स्वप्नं ॥१॥
जग जागोजागी म्हणती तुजला थोर
तू ज्येष्ठ म्हणोनी तुझा खरा अधिकार
सहवेना हे त्या, म्हणुन गुप्त हा यत्न ॥२॥
आमीष असे रे मेळ्याचे हे तुजला
धाडितो तुम्हाला दूर रम्य नगरीला
तो करील तुमचा घात तिथे नेऊन ॥३॥
गवताने वेष्टित विहिर जणू रानात
बेसावध शत्रू मरुन पडतो त्यात
षड्यंत्र असे हे, त्यासम रचले पूर्ण ॥४॥
उपयोजुन सगळी द्रव्ये ज्वालाग्राही
बांधिले भवन ते मोठे राजेशाही
ते भवन कशाचे ? यमसदनाची खूण ॥५॥
जाळून मारण्या ठेवि तुम्हासी तेथे
हे अग्नीचे भय जाणुन घे तू पुरते
नेमिला पुरोचन ह्यास्तव दुष्ट प्रवीण ॥६॥
ह्यावरी तोडगा आहे रे मजपाशी
मी खनक पाठविन गुप्तपणे सदनासी
तू जाण तयाला म्लेंच्छ शब्द ही खूण ॥७॥
तो खनक तुम्हासी खोदिल एक भुयार
त्या मार्गे जावे, व्हावे गंगापार
तो खणतांना परि नको कुणा कुणकूण ॥८॥
पक्षातिल दुसर्या चतुर्दशीला राया
लावील आग तो बघुन रात्रिच्या समया
त्याक्षणी बिळातुन जावे शीघ्र निघून ॥९॥
हे संकट मोठे तुम्हा असे अज्ञात
तिमिरातच आहे दडलेली ही वाट
मी करितो सावध, रक्षा अपुले प्राण ॥१०॥