यादवांचा नाश
युधिष्ठिराच्या राज्याच्या छत्तीस वर्ष पूर्ण होत असताना द्वारकेत विनाशकारी घटना घडत होत्या. गांधारीने जो शाप दिला होता त्याची छाया पडताना दिसत होती. विश्वामित्र, कण्व व नारद हे तीन ऋषी द्वारकेला आले असताना काही यादवांनी त्यांचा अपमान केला. सांबाला गर्भवती स्त्रीचे रूप देऊन त्यांच्यापुढे उभे केले व विचारले कि हिला पुत्र होईल की कन्या! ऋषींनी अंतर्ज्ञानाने सर्व ताडले. त्यांना पार राग आला व त्यांनी शाप दिला की त्या पुरुषाला एक मुसळ होईल व ते सर्व यादवांचा नाश करील. दुसर्या दिवशी खरोखर शापवशात मुसळ जन्मले. यादव घाबरले व त्यांनी त्याचे चूर्ण करून ते समुद्रात टाकून दिले. तेथे वेताचे गवत उगवले. पुढे प्रभासक्षेत्री तीर्थाटन म्हणून यादव जमले असताना त्यांच्यात वादावादी झाली. सर्वांनी खुप मद्यपान केले व सात्यकी आणि कृतवर्मा यांच्यात भांडण उपस्थित होऊन कृष्णासमोरच सात्यकीने कृतवर्म्याला ठार केले. अंधक, भोजांनी सात्यकीस मारले. यादव एकमेकांवर तुटून पडले. हातातले वेत मुसळ बनत गेले व या मुसळाच्या वारांनी ते सर्व नाश पावले. कृष्णाने भवितव्यता ओळखली. तो वनात जाऊन झाडाखाली बसला असताना व्याधाचा बाण लागून त्याचाही अंत झाला. एक युगाचा कर्ता योगेश्वर कृष्ण आपले कार्य संपवून स्वस्थानी परत गेला.
यादवांचा नाश
मुनिशापाने यादवकुळिचा
विनाश ओढवला ॥धृ॥
विश्वामित्र कण्व अन् नारद
द्वारकेस ते आले अवचित
यादव करिती त्यांचे स्वागत
परी कुणी ना ओळखले त्या नियतीच्या पावला ॥१॥
आणले साम्बासी थट्टेने
गर्भवती स्त्रीच्या रूपाने
पुसति मुनिंना अविचाराने
होइल का पुत्राची प्राप्ती ब्रभ्रू-भार्येला? ॥२॥
अंतर्ज्ञानी मुनिवर होते
क्रोधित झाली त्यांची चित्ते
आवरु न शकले शापशब्द ते
जन्मा घालिल पुरुष तुमचा-कुलनाशी मुसळा ॥३॥
टिटव्यांचे ध्वनि कानी आले
नगरीचे मुख मलीन झाले
लिखित विधीचे कृष्णा दिसले
प्रसादातिल मूर्तिपुढला, महादीप विझला ॥४॥
घडले अद्भुत मुसळ जन्मले
चूर्ण करोनी जळी टाकले
जना वाटले नष्टच झाले
परी क्षणातच बनुन लव्हाळे, आले जन्माला ॥५॥
प्रभासक्षेत्री मद्य सेवुनी
वृष्णी, अंधक धुंद होउनी
जुनेच तंटे पुन्हा काढुनी
कृतवर्मा सात्यकी भांडले - कलह एक माजला ॥६॥
बंधुभाव विसरुनिया जाती
परस्परावर घाव घालती
अगम्य भासे खरेच नियती
प्रद्युम्ना भोजांनी वधिले, कृष्णपुत्र गेला ॥७॥
जळातले हातात लव्हाळे
प्रहारसमयी बनती मुसळे
दारुण ते रणकंदन दिसले
त्वेषाने धावून मारिती, अंधक सात्यकीला ॥८॥
पुत्र पित्याला, पिता सुताला
जिवे मारती परस्पराला
अनीरुद्धही प्राणा मुकला
उघड्या नेत्री माधव पाही यादव-नाशाला ॥९॥
काळाने वेढिले कुळाला
जाणुन कृष्णहि वनी पोचला
तरुतळाशी जाउन बसला
मृगमुख समजुन व्याधाने शर चरणावर मारिला ॥१०॥
खोल व्यथा कृष्णाच्या चित्ता
क्रूर नियतीची क्रीडा बघता
कुठे प्रेम ते? कुठे बंधुता?
भरल्या नेत्री बघे यदुपती शून्य अशा भूमिला ॥११॥
योगसमाधी शीघ्र लागली
प्राणज्योत कृष्णाची विझली
आकाशातुन आसवे गळली
कृष्णदेह पडताच सृष्टिचा प्राण जणू हरपला ॥१२॥