कृष्णाचे सडेतोड उत्तर
शेवटच्या घटका मोजीत असलेल्या त्या गर्विष्ठ दुर्योधनाचे अपमानकारक भाषण कृष्णाला सहन झाले नाही. ज्या पापांमुळे त्याने सर्वनाश ओढवून घेतला त्या गैरकृत्यांची यत्किंचितही जाणीव न ठेवता तो शेवटच्या क्षणीही ज्या उद्दामपणे बोलला ते पाहून कृष्णाला राग आला. त्याच्या दुराग्रही व लोभी वृत्तीमुळे युद्धावर पाळी आली व अठरा दिवसात अपरिमित असा नरसंहार झाला. याबद्दल त्याला किंचितही पश्चात्ताप वाटत नसल्याचे पाहून कृष्ण आश्चर्यचकित झाला. कृष्णाने त्याचे सर्व अपराध त्याच्या पदरात घालीत कठोर शब्दात त्याची कानउघडणी केली. त्याला सांगितले "सुयोधना तुझ्या दुष्कृत्यांमुळेच तू ज्ञातिबांधवांसह प्राणास मुकतो आहेस. पांडवांना मारण्यासाठी योजलेले घातपाताचे उपाय विसरलास काय ? द्रौपदीची भर सभेत तू जी विटंबना केलीस तेव्हाच तुझा वध व्हायला पाहिजे होता. तुझ्या सर्व पापांचे फळ भोग आता !"
कृष्णाचे सडेतोड उत्तर
दुष्कृत्यांनी हात कलंकित तुझेच दुर्योधना
तयांची भोग फळे दुर्जना ॥धृ॥
तुझ्याकारणे द्रोण प्रतापी यमसदनी गेले
इच्छा नसता रणात लढता भीष्म पतन पावले
तुझ्यामुळे कर्णासह बांधव मुकले रे प्राणा ॥१॥
तुझ्याकडे येऊन याचिली पाचच गावे मी
गर्विष्ठा तू तरी दिली ना कणभरही भूमी
करार असता का न दिले तू राज्य पांडवांना ? ॥२॥
देववुनी विष जळी बुडविले मारण्यास भीमा
दुष्टबुद्धिला तुझ्या नसे रे कुठलीही सीमा
जतुगृही तू ठार मारण्या नेले पार्थांना ॥३॥
दासी ठरवुन सभेत आणले तू पांचालीला
विटंबनेच्या क्षणीच दुष्टा वधा पात्र झाला
कुठे फेडशिल या कृत्यांना, तुझ्या पातकांना ? ॥४॥
अल्पजाण द्युताची ज्याला त्याला बोलविले
द्यूतकुशल शकुनीशी त्याला कपते खेळविले
लुटले त्याचे जे जे होते, धाडिलेस त्या वना ॥५॥
तृणबिंदूच्या आश्रमदेशी पाहून ती एकटी
पांचालीच्या अपहरणास्तव येई सिंधुपती
क्लेश दिले तिज नराधमाने, गांधारीनंदना ॥६॥
अभिमन्यूला कसे मारले आठव रे तू जरा;
हजार कारस्थाने रचिली, वाढविले वैरा
तूच करविला अंत कुळाचा भोग अता यातना ॥७॥
कुठे लोपली सेना राजा अकरा अक्षौहिणी ?
कशास लपला र्हदात तूही होता जर मानी ?
सर्वनाश हा पाहुन आठव, तुझ्याच त्या वल्गना ॥८॥
दशमदिनी भीष्मांचा सल्ला का तू नाकारला ?
लोभाच्या आहारी जाऊन अंध कसा झाला ?
दोष नको तू देउ कुणाला, देई तो आपणा ॥९॥
भीष्मविदूरा गांधारीला तृणसम तू लेखिले
जन्मापासुन नीतिनियमा पायदळी तुडविले
अपराधांनी तुझ्या कौरवा जासी यमसदना ॥१०॥