पांडव-जन्मकथन
पांडुराजा महापराक्रमी व धर्मनिष्ठ होता. त्याने अनेक राजे जिंकले व राजमंडळात श्रेष्ठ स्थान मिळवले. एकदा वनात किंदम ऋषी भार्येसह मृगरुप धारण करुन विहार करीत होता. राजाने मृग समजून जो बाण मारला तो या ऋषीला लागला. त्यावेळी ऋषी रतिमग्न होता. भूमीवर कोसळल्यावर ऋषीने क्रोधाने राजाला शाप दिला की तोही असाच स्वस्त्रीशी समागममग्न असतांनाच मरण पावेल. राजा अतिशय चिंतातुर झाला. तो आपल्या भार्यांसह, राजवैभवापासून दूर वनात राहू लागला. आता आपण कायमचे निरपत्य राहाणार व निरपत्यच मरणार याचे त्याला दुःख वाटत राही. राणी कुंतीला त्याच्या दुःखाचे कारण कळल्यावर तिने त्याला वशीकरण मंत्रांविषयी सांगितले. राजाच्या आग्रहाखातर तिने यमधर्माला आवाहन केले. मंत्रप्रभावामुळे त्याच्यापासून तिला तो पुत्र झाला तो युधिष्ठिर ! त्यावेळी आकाशवाणी झाली की हा धर्मनिष्ठांमध्ये श्रेष्ठ होईल. राजाच्याच सांगण्यावरुन पुढे तिने वायुदेवतेपासून भीमसेन व इंद्रापासून अर्जुन असे महाप्रतापी पुत्र मिळविले. तेव्हाही त्यांच्या गुणानुरुप आकाशवाणी झाली. माद्रीनेही राजाच्या मध्यस्थीने कुंतीकडून मंत्र मिळविले व अश्विनीकुमारांना आवाहन करुन जुळे पुत्र मिळविले---ते नकुल व सहदेव होत. पाच पुत्रांच्या प्राप्तीमुळे राजाचे मन संतुष्ट झाले.
पांडव-जन्मकथन
वनी त्या लाभले दैवे, नृपाला पाचही पुत्र ॥धृ॥
मनाने खिन्न तो नृपती
सदा त्या सावरे कुंती
वदे ती त्यास एकांती
सुतास्तव जाणते मंत्र ॥१॥
दिले तिज मंत्र ते मुनिने
जाणले सर्व पांडूने
अता ह्या मंत्रशक्तीने
तयाचे पालटे चित्र ॥२॥
यमाला बोलवी कुंती
वशीकर मंत्र ती चिंती
जन्मला धर्म तो पोटी
युधिष्ठिर पुण्यशिल थोर ॥३॥
मूल हे जन्मता पहिले
शकुन ते सर्व शुभ झाले
नृपाचे चित्त ना शमले
पुन्हा तो विनवि कुरुवीर ॥४॥
कृपेने वायुच्या झाला
पृथेला पुत्र तो दुसरा
आगळे तेज ते त्याला
बळाने श्रेष्ठ नरवीर ॥५॥
नृपाची होय ना तृप्ती
पुन्हा तो कुंतिला प्रार्थी
जयाची त्रिभुवनी ख्याती
असा दे पुत्र रणशूर ॥६॥
प्रार्थिता इंद्र स्वर्गीचा
जाहला लाभ पुत्रांचा
नभातुन उमटली वाचा
’नरमुनी घेत अवतार’ ॥७॥
नृपासी प्रार्थिते माद्री
’झुरे मी पुत्र ना उदरी
करा मज धन्य संसारी
मला द्या एकदा मंत्र’ ॥८॥
पृथेला सांगतो नृपती
ऐक तू माद्रिची विनती
तिला दे मंत्र एकांती
तिचा गे तूच आधार ॥९॥
विनविते मद्रकन्या ती
कुमारा अश्विनी दोन्ही
सुतांची लाभली जोडी
भरुनी येत ते नेत्र ॥१०॥
नृपाच्या हर्ष हृदयाला
स्वर्गही ठेंगणा झाला
सुखाचा काळ हा दिसला
तमाची संपली रात्र ॥११॥