द्रौपदीस्वयंवर
भीमाने बकासुराचा वध केला व सर्वांना संकटातून सोडवले. त्या ब्राह्मणाकडे ते ब्राह्मणवेशानेच राहात होते. तेथून निघाल्यावर प्रवासात त्यांना एक ब्राह्मणसमुदाय भेटला. त्या ब्राह्मणांनी द्रौपदी-स्वयंवराची माहिती दिली. त्या पाचांचे तेज पाहून त्यांनीही स्वयंवरात जरुर भाग घ्यावा असे सुचविले. द्रौपदी व धृष्टद्युम्न ही दोन अपत्ये द्रुपदाला यज्ञवेदीतून लाभली होती. द्रौपदीचे लावण्य अप्रतीम होते. यज्ञसेन राजाची मनातून इच्छा होती की द्रौपदी अर्जुनासारख्या विख्यात धनुर्धराला द्यावी. पण पांडवांबद्दल काहीच नीट कळत नव्हते. अर्जुनासारख्यालाच जिंकता येईल असा लक्ष्यवेध करण्याचा कठीण पण त्याने जाहीर केला. देशोदेशीचे राजे समारंभाला उपस्थित झाले. कर्णशल्यादींनी प्रयत्न केला पण लक्ष्यवेध कोणालाच करता आला नाही. अर्जुनाने मात्र असामन्य कर्तृत्व दाखवले, लक्ष्यवेध केला; त्याचा जयजयकार झाला. त्याच्यावर इंद्राने दिव्य पुष्पवृष्टी केली. क्षत्रिय राजे मात्र नाराज झाले. ब्राह्मणाला कन्या देता येणार नाही असा वाद होऊन युद्ध उभे राहिले. अर्जुनाने सर्वांचा पराभव केला.
घरी परतल्यावर कुंतीने आपल्या कक्षातूनच ’आणलेली भिक्षा वाटून घ्या’ असे म्हटले. नंतर तिने आपली चूक झाल्याचे धर्मास सांगितले. धर्माने अर्जुनाला तिचे प्राणिग्रहण करण्यास सांगितले. पण अर्जुन म्हणाला आधी ज्येष्ठ भावाचा विवाह झाला पाहिजे. द्रौपदीच्या रुपामुळे पाचही पांडव तिच्याकडे आकृष्ट झालेले पाहून व कुंतीचे बोलणे लक्षात घेऊन युधिष्टिराने ती पाचांची भार्या होईल असे ठरविले.
द्रौपदीस्वयंवर
पांडवांना वृत्त कळले विप्रवर्यांच्या मुखे
द्रुपकन्येचे स्वयंवर भूपतीने योजिले ॥धृ॥
जन्मली वेदीतुनी ती द्रौपदी तेजस्विनी
देवकन्येचे जणू ते रुप मोहक आगळे ॥१॥
विस्मये ऐकून सारे धर्मसुत ठरवी मनी
जाउ या बघण्यास तेथे ते अलौकिक सोहळे ॥२॥
दूरदुरुनी विविध राजे मंडपी त्या पातले
मञ्चके त्यासी पुरेना दाटिने ते बैसले ॥३॥
अर्जुनासी द्यावि कन्या यज्ञसेनाच्या मनी
शोध घेण्याला तयाचा विविध मार्गा चिंतिले ॥४॥
लाविला पण अर्जुनाविण शक्य कोणा जो नसे
घोषणा होताच याची स्तिमित मंडळ जाहले ॥५॥
"यंत्र फिरते ठेविले वर, लक्ष्य त्यासी जोडिले
लक्ष्यवेधास्तव इथे हे भूवरी धनु ठेविले ॥६॥
वीर जो लक्ष्यास वेधिल वरिल त्यासी यज्ञजा"
मंडपी हे शब्द घुमले, लक्ष्य जो तो न्याहळे ॥७॥
पाहुनी ते पाच ब्राह्मण तेज त्यांचे दिव्यसे
विप्र नच हे हेच पांडव खास कृष्णा वाटले ॥८॥
रुक्म-कर्णा शल्य-शाल्वा कार्य ना ते साधले
येत अर्जुन विप्रवेषी भाग्य बघण्या आपुले ॥९॥
रंगमंची पाहुनी वर, अचुक धरला नेम तो
स्तब्ध सगळे अन् क्षणातच लक्ष्य त्याने वेधले ॥१०॥
इंद्रसम तो वीर पाहुन हर्ष कन्येच्या मनीं
पुष्पमालेच्या मिषाने चित्त वधुने अर्पिले ॥११॥
याज्ञसेना विदित होई विप्र असती पांडव
जिंकले ज्याने पणाला तोच अर्जुन जाणले ॥१२॥
अग्निसाक्षीने नृपाने पांडवा कन्या दिली
द्रुपसंगे स्वजन सगळे मंडपी आनंदले ॥१३॥