धृतराष्ट्राचा उपदेश
धृतराष्ट्राला कृष्णाचा समेटाचा प्रस्ताव मान्य होता. आतापर्यंत पुत्रप्रेमामुळे त्याने दुर्योधनाला कधीच आवरले नाही. पण यावेळी मात्र त्याने दुर्योधनाला पांडवांना इंद्रप्रस्थाचे राज्य परत करण्याचा सल्ला दिला. कृष्णाने पांडवांकडे परतल्यावर युधिष्ठिराला कौरवसभेत घडलेले सर्व निवेदन केले; त्यातून धृतराष्ट्राने जो उपदेश केला तो आपल्याला कळतो. धृतराष्ट्राने सांगितले---- पांडवांचे राज्य तू द्यूतात मिळविलेस हे आता त्यांना देणे क्रमप्राप्त आहे. युद्धावर तू पाळी आणू नको. अर्जुन, भीम तसेच इतरही पांडव महाप्रतापी व तेजस्वी आहेत. ऋषींनीही तुला परोपरीने ते अजिंक्य असल्याचे सांगितले आहे. कृष्ण त्यांच्या पाठीशी आहे. दुरभिमान व राज्यलोभ यांच्या आहारी जाऊ नको. राज्य ज्येष्ठाला द्यावे हा संकेत असला तरी ज्येष्ठ जर दुर्गुणी, पातकी अथवा गर्विष्ठ असेल तर गुणवान अशा कनिष्ठाला राज्य मिळते. ययातीने कनिष्ठ पुत्राला या कारणास्तव राज्य दिले. मीही राज्यापासून वंचित राहिलो कारण शास्त्रानुसार राजा अव्यंग असावा लागतो. माझ्या अंधत्वामुळे कनिष्ठ पांडूला राज्याचा अधिकार मिळाला. त्याच्यानंतर पांडवांचा हक्क होता. पण कलह टाळण्यासाठी भीष्मांनी तुम्हा दोघात राज्य विभागून दिले. तेव्हा त्यांना राज्य देणे हेच योग्य होय.
धृतराष्ट्राचा उपदेश
ऐक कौरवा, माधववचना, सोड अट्टाहास
न्याय्य मागणे धर्मसुताचे देइ राज्य त्यास ॥धृ॥
इंद्रप्रस्थ हे त्यांचे ठरले
द्युतातुन ते तुला मिळाले
परत करी ही ठेव, संपला त्यांचा वनवास ॥१॥
अंधत्वाचा शाप रे मला
म्हणुन लाभले राज्य पांडुला
वनी अचानक पराक्रमी तो गेला स्वर्गास ॥२॥
त्याच्यानंतर राज्य कुणाचे
कुलरीतीने पांडुसुताचे
कलह टाळण्या दिले विभागुन दोघा भावांस ॥३॥
नको करु तू लोभ कशाचा
नको मार्ग तो अन्यायाचा
चहूबाजुनी सुखे स्पर्शिती तुझिया चरणास ॥४॥
तूही भोगसी राज्यवैभवा
अंकित राजे करिती सेवा
संपत्तीला नसता सीमा कशास हव्यास ? ॥५॥
समुद्र ओलांडित ना वेला
तू उल्लंघू नको नीतिला
कशास तू इच्छितो बंधुच्या राजमुकूटास ? ॥६॥
ज्येष्ठाअंगी दिसता अवगुण
देति न त्या ज्येष्ठा सिंहासन
देइ ययाति यदूस सोडून राज्य कनिष्ठास ॥७॥
शंतनुराजा कनिष्ठ होता
मिळे वारसा तयाच्या सुता
बोध घेइ अपुल्याच कुळातिल जाणुन इतिहास ॥८॥
सत्यनिष्ठ सद्गुणी युधिष्ठिर
वरदहस्त कृष्णाचा त्यावर
आदर देइल तो वृद्धांना, स्नेह कौरवास ॥९॥
मिटव अता तू कुलकलहाला
पार्थ विसरले अपकाराला
बंधुत्वाचे पुन्हा येउ दे नाते उदयास ॥१०॥