गांधारी-विवाह
धृतराष्ट्र, पाण्डु व विदुर या तीन राजकुमारांचे भीष्मांनी अगदी प्रेमाने पुत्रवत पालन केले. धनुर्विद्या, गजशिक्षा, गदायुद्ध तसेच इतिहास-पुराण, नीतिशास्त्र इत्यादींचे शिक्षण देऊन त्यांना सामर्थ्यसंपन्न बनविले. पाण्डु धनुर्धरात व धृतराष्ट्र मल्लविद्येत श्रेष्ठ झाले. विदुर त्या राजघराण्यात दासीपुत्र असल्याने राजा होऊ शकत नव्हता पण त्याचे उत्तम शिक्षण होऊन तो मोठा ज्ञानी झाला. यादव कुळातील शूर राजाची कन्या कुंती हिचा पाण्डुशी व गांधारराज सुबलाची कन्या गांधारी हिचा धृतराष्ट्राशी विवाह झाला. या कन्या कुलीन, रुपसंपन्न तर होत्याच पण कुरुकुलाला साजेशा होत्या. गांधारीला शंभर पुत्र होतील असे वरदान शंकरापासून मिळाले होते व हे भीष्मांना माहीत होते. गांधारीला कळले की आपला नियोजित पती आंधळा आहे. तरी तिने आनंदाने ते मान्य केले. गांधारी परिपक्व बुद्धीची, धर्माचरण करणारी, चारित्र्यसंपन्न स्त्री होती. पातिव्रत्यधर्म म्हणून तिने बोहल्यावर चढताना लगेचच आपल्या नेत्रावर पट्टी बांधुन घेतली आणि पतीला शेवटपर्यंत साथ दिली.
गांधारी-विवाह
गांधारनृपाची सत्त्वशालिनी तनया
योजितो नदीसुत धृतराष्ट्राची भार्या ॥धृ॥
बलवान जाहला ज्येष्ठ अंबिकापुत्र
धनुधरात तळपे पांडु जसा नभि मित्र
भीष्मांनी केली राजसुतांवर माया ॥१॥
पाहून अंबिकासुता अंध जन्माने
पांडुस भूपती केले शांतनवाने
चमकली कुळाची पुन्हा कीर्तिने काया ॥२॥
वधु शोधित असता ज्येष्ठ कुमारासाठी
भीष्मांना कळली गांधारीची कीर्ती
शिव प्रसन्न केला शतपुत्रा मिळवाया ॥३॥
हे वृत्त जाणुनी पाठविले दूतासी
संदेश दिला हा दूताने सुबलासी
याचिले नृपाळा कन्या कुरुकुलि द्याया ॥४॥
तो कुमार आहे नेत्रहीन जाणून
झणिं झाले त्याचे सचिंत अंतःकरण
कुल, शील लौकिका पाहि परी तो राया ॥५॥
गांधारिस कळले कोण योजिला भर्ता
धर्मास जाणुनि अविचल ठेवी चित्ता
ती मुळी न खचली वरमाला घालाया ॥६॥
वस्त्राची पट्टी करुन बांधली नयनी
राहिली पतीसम वंचित तीहि सुखांनी
जणु आदर्शाचा धडा दिला गिरवाया ॥७॥
धन-यौवनयुक्ता भगिनी अर्पी शकुनी
सोहळा पाहुनी कुले तोषिली दोन्ही
निजगुणे शोभती श्रेष्ठ पती अन् जाया ॥८॥
पतिसेवेसाठी त्याग सर्वही केले
वर्तने आपुल्या तोषविले कुरु सारे
साध्वी असोनी रणात प्राणा मुकले
परि धर्मावरले चित्त कधी ना ढळले
ती जागली होउन पतिदेवाची छाया ॥१०॥