शिखण्डीचे वृत्त
कृष्णाचे सर्व प्रयत्न विफल झाल्यावर युद्ध अटळ झाले. कौरवपक्षात महापराक्रमी व ज्येष्ठ असे भीष्म होते. दुर्योधन राजाने त्यांना सेनापतीपद दिले. त्यांचा पाडाव द्रुपद-पुत्र शिखण्डीमुळे युद्धात झाला हे पुढे येणारच आहे. हा शिखण्डी म्हणजे पूर्वजन्मातील अम्बा होय. भीष्मांनी काशिराजाच्या तीन कन्या विचित्रवीर्यासाठी स्वयंवरातून पळवून आणल्या होत्या व त्यातील एकीला----अम्बेला त्यांनी शाल्व राजाकडे पाठवून दिले; कारण तिचे त्याच्यावर प्रेम होते. पण शाल्वाने तिचा स्वीकार केला नाही. भीष्म तर तिला स्वीकारु शकत नव्हते. याचा तिला फार राग आला, तिने भीष्मांच्या वधाचा निर्धार केला. तिने तप केले व शंकराचा वर मिळविला. ती द्रुपदाची कन्या म्हणून जन्माला आली. द्रुपदानेही शंकराचे वरदान मिळविले होते व त्याला पुत्र होणार होता. कन्या झाली हे सत्य लपवून त्याने पुत्र झाल्याचे जाहीर केले. पुत्र शिखण्डी म्हणूनच त्याने तिला वाढविले. एका राजकन्येशी विवाहही करुन दिला. शंकराने सांगितले होते की हे द्रुपदा ही कन्या पुढे पुरुष होईल. लग्नानंतर शिखण्डी स्त्री असल्याचे त्याच्या सासर्यांना कळले. त्या राजाने द्रुपदावर हल्ला करायचे ठरवले. त्या दुःखातून द्रुपदाला मुक्त करावे म्हणून शिखण्डी वनात पळून गेला. तेथे त्याला स्थूणकर्ण नावाच्या यक्षाने अल्पकाळासाठी आपले पुरुषत्व दिले व त्याचे स्त्रीत्व त्याने घेतले. पण पुढे कुबेराच्या शापामुळे स्थूणकर्ण कायमचा स्त्री झाला व शिखण्डी आपोआपच पुरुष म्हणून जगला.
शिखण्डीचे वृत्त
मूल लाभले द्रुपदनृपासी शंकर-वरदाने
त्यास ठेविले नाव शिखण्डी शूर पार्षताने ॥धृ॥
यज्ञसेन राजाने केले तप पुत्रासाठी
कन्या परि त्या दिली शिवाने झाला तो कष्टी
’हीच पुरुष होईल जीवनी’ कथिले ईशाने ॥१॥
’पुत्र जन्मला’ घोषित केले समारंभ झाले
पुत्रासम कन्येचे पालन दाम्पत्ये केले
किती काळ हे गुपीत राहिल चिंतित दोन्हि मने ॥२॥
ढगाआडच्या चंद्रकलेसम सत्यासी झाकिले
’कन्या आजचि पुत्र उद्याचा’ मानुन वाढविले
वचन सत्य होईल शिवाचे या दृढ श्रद्धेने ॥३॥
अनेक वर्षे अशी लोटली आला तो यौवनी
हिरण्यवर्मा घाली सत्वर पुत्राला मागणी
विवाह झाला मने जोडली मंगल नात्याने ॥४॥
नव्या वधूला मुळिच कळेना कसली चिंता घरा
शिखण्डिला भय वाटे चित्ती पाहाताच दारा
एकांती परि स्त्रीत्व जाणिले पतिचे भार्येने ॥५॥
कोमळ कन्येच्या ना सीमा राहिलि दुःखाला
पती नसे नर सांगे स्फुंदुन सखिला, धात्रीला
हिरण्यवर्मा देइ दूषणे मोठया क्रोधाने ॥६॥
"सिद्ध रहा तू घोर रणाला’ सांगे द्रुपदाला
"महान संकट आले" सांगे द्रुपदहि पत्नीला
वनात जाण्या निघे शिखण्डी ऐकुन ही वचने ॥७॥
लाञ्छन माझ्यामुळे कुळाला होत मना यातना
दुःखातच तो दैवे आला यक्षरक्षिल्या वना
स्त्रीत्व आपुले, सगळे कथिले यक्षा कन्येने ॥८॥
पुरुषत्वाचे तिचे मागणे यक्षाने पुरविले
स्त्रीत्व घेऊनि तिचे, आपुले नरत्व तिजसी दिले
संशय गेला, युद्धहि टळले, दैवी घटनेने ॥९॥
वनात आला कुबेर तिकडे, स्थूण पुढे येइना
स्त्रीत्वाचे कळताच कोपला पाहुन त्याचा गुन्हा
"या जन्मी तू स्त्रीच राहशिल’ शाप दिला त्याने ॥१०॥
वित्तेशाचा शाप कळाला द्रुपदाच्या तनया
हर्ष मनी मावेना पाहुनी नियतीची किमया
शाप ठरे वर त्याच्यासाठी स्त्रीपण गेल्याने ॥११॥