अर्जुनाचे आवाहन
तीव्र शोकामुळे विचारशक्ती कुंठित झालेल्या युधिष्ठिराचे भाषण ऐकल्यावर सर्व पांडव सुन्न झाले. एवढे कष्ट व प्रयत्न करून व सर्वांनी एवढी पराक्रमाची शर्थ करून मिळविलेल्या राजलक्ष्मीचा असा त्याग करणे सर्वथैव अयोग्य होय असे सर्वांना वाटले. भीम, अर्जुन, नकुल, द्रौपदी व स्वतः द्वैपायन व्यास यांनी भावनेच्या आहारी गेलेल्या युधिष्ठिराला परोपरीने सांगितले- युद्ध करणे, शत्रूला धडा शिकविणे व अन्याय निवारण करणे हा क्षत्रियाचा धर्म आहे. अनेक बांधव, सुह्र्द, हितचिंतक तसेच विविध देशांच्या राजांनी पांडवांसाठी बलिदान दिले तेव्हा कुठे हा विजयाचा दिवस दिसला. तो विजय पराजय कसा मानता येईल? क्षत्रियधर्माचे पालन करुन राजे युद्धात प्राणास मुकले आहेत. त्यात युधिष्ठिराचा काय दोष? अर्जुनाने युधिष्ठिराला निक्षून सांगितले की राजकर्तव्याचा विचार न करता सिंहासनाचा त्याग करणे हे बुद्धिलाघवाचे लक्षण आहे. त्याचे हे विचार आधीच कळले असते तर पांडवांनी शस्त्र हातात घेतलेच नसते व कुणाचाही वध केला नसता. मोहाला बळी पड्न युधिष्ठिराने पुन्हा सर्वांना दुःखाच्या खाईत लोटू नये
अर्जुनाचे आवाहन
सोड पांडवा विचार मनिचा
नको असे बोलू शोकातुन
उभा आज विजयाच्या शिखरी
भूषव पृथ्वीचे सिंहासन ॥१॥
बलवत्तर शत्रूशी लढुनी
महापराक्रम तू गाजविला
धर्माने हे सर्व मिळविता
वनगमनाचे शब्द कशाला? ॥२॥
राज्य गिळोनी घात आमुचा
करण्यासाठी रणी उतरले
कपट कलह जे करित राहिले
ते तर वैरी, बंधू कसले? ॥३॥
आठव दुःखे अपुली वनिची
आठव पीडा पांचालीची
दिवस सुखाचे हे लाथाडुन
बघसी का स्वप्ने दुःखाची? ॥४॥
चित्त तुझे मोहाने लिंपित
योजिलेस ते तपही अनुचित
नवे युद्ध तू जिंक मनीचे
दुर्विचार हा शत्रू निश्चित ॥५॥
ज्या सर्पांनी कपटाने तुज
दुःखाच्या खाईत लोटले
त्यांना तू समरात ठेचले
पातक धर्मा, यात कोठले? ॥६॥
पृथ्वीचा तू श्रेष्थ अधिपती
दाने दे तू हजारहाती
तुझे हात सोन्याचे असता
कशी इच्छितो भिक्षावृत्ती? ॥७॥
हसे तुझे होईल नृपाळा
भिक्षेची धरली जर वृती
आधी कळते जर बंधुंना
धनु घेतले नसते हाती ॥८॥
विहिर खणावी शतयत्नांनी
जल न भोगता जावे निघुनी
तद्वत अमुचे व्यर्थ परिश्रम
तू जाता हे राज्य सोडुनी ॥९॥
सुह्रद, नृपांनी दिल्या आहुती
त्या बलिदाना कसे विसरतो?
स्वर्गाप्रत गेलेली कीर्ती
भूमिवर तू कशास आणतो? ॥१०॥
क्षत्रिय-धर्माचे करि पालन
राजदण्ड तू घेई हाती
दिसो प्रजेला दिन सौख्याचे
नांदू दे या जगती शांती ॥११॥