धर्माला आशीर्वाद
दोन्हीकडील सेनांची मोठया कौशल्याने विभागणी केली होती. दुर्योधनाने परिश्रम घेऊन अकरा अक्षौहिणी सेना जमविली होती. भीष्मांना सेनापतिपदाचा अभिषेक होण्यापूर्वी त्याने, कृप, द्रोण, शल्य, जयद्रथ, सुदक्षिण, कृतवर्मा, अश्वत्थामा, कर्ण, भूरिश्रवा, शकुनी व बाल्हीक हे अकरा महरथी त्यांच्या अकरा अक्षौहिणी सेनेकरिता प्रमुख म्हणून नेमून दिले होते. पांडवांच्या सात अक्षौहिणी सेनेकरिता द्रुपद, विराट, सात्यकी, धृष्टद्युम्न, धृष्टकेतू, शिखंडी व जरासंधसुत सहदेव हे सात प्रतापी वीर प्रमुख म्हणून नेमले होते. धृष्टद्युम्न मुख्य सेनापती होता व अर्जुन प्रमुख सूत्रधार होता. रणांगणावर कृष्णार्जुन-संवाद सुरु होता. दोन्हीकडील सेना, रणभूमीच्या मध्यभागी असलेल्या अर्जुनाच्या रथाकदे टक लावून बघत होत्या. गीतोपदेश संपल्यावर अर्जुनाचा रथ आपल्या स्थानी आला. संजयाला व्यासांच्या कृपाप्रसादाने दिव्य चक्षू मिळाले. त्यामुळे त्याला धृतराष्ट्राला रणांगणावरील घडामोडी दररोज सांगता आल्या. युद्ध एकूण अठरा दिवस चालले. त्यात कौरवांकडचे पाच सेनापती झाले. भीष्म, द्रोण, कर्ण, शल्य व अश्वत्थामा ! पांडवांकडचा मात्र धृष्टद्युम्न हा एकच सेनापती झाले. भीष्म, द्रोण, कर्ण, शल्य व अश्वत्थामा ! पांडवांकडचा मात्र धृष्टद्युम्न हा एकच सेनापती शेवटपर्यंत होता. अर्जुन परत आल्यावर युधिष्ठिर रथातून उतरुन पितामहांकडे चालत जाऊ लागला. कौरवांच्या सैनिकांना वाटले राजा युधिष्ठिर घाबरला असून भीष्मांना शरण येत आहे. कृष्णाला मात्र खरे कारण समजले होते. युधिष्ठिर युद्धात विजयाचा आशीर्वाद घेण्यासाठी भीष्म, द्रोण, इत्यादी श्रेष्ठांकडे गेला होता. सर्वांनी त्याला जय होईल असा आशीर्वाद दिला.
धर्माला आशीर्वाद
येतसे धर्म नमस्कारा ॥धृ॥
पांडुसुताची कुरुराजाची उभी सज्ज सेना
करीती योद्धे रणगर्जना
शंखदुंदुभी रणी वाजती. नाद नभी भिडला ॥१॥
कुंतीसुताने कवच काढिले, शस्त्र ठेविले रथी
विस्मये भीमार्जुन पाहती
पायी चालत निघे भूपती, पाहत भीष्माला ॥२॥
अर्जुन-कृष्णहि शीघ्र निघाले राजाच्या मागुनी
वीर ते होती चकित मनी
शब्द न वदता तो भीष्मांच्या रथानिकट आला ॥३॥
वीर कुरुंचे हसुन बोलले पाहुन धर्माला
"काय हा शरण नृपा आला ?
हात पहा जोडून येतसे वाटे भ्यालेला" ॥४॥
निकट येऊनी धर्म प्रार्थना करितो भीष्मासी
"कृपेने पहा पांडवासी
विजयासाठी द्यावा आशिष, प्रणाम स्वीकारा" ॥५॥
पाहुन आदर विनय तयाचा भीष्म मनी हर्षले
तयाचे हीत, सदा चिंतिले
आज परी ते रणी वाहती सुयोधनाची धुरा ॥६॥
"अर्थाच मी दास पांडवा, उपकारा स्मरुनी
लढे मी कुरुपक्षाकडुनी
तुझाच जय होईल या रणी, घे आशिष तुजला" ॥७॥
द्रोणरथासी जाउन केली हीच त्यांस विनवणी
पांडवा सांगितले त्यांनी
"अर्थाचा मी दास परंतु विजय मिळे तुजला" ॥८॥
कृपाचार्य अन् शल्यमातुला वंदन ते केले
तयांचे आशिष मागितले
अगतिक आम्ही अर्थाने रे वदले भूपतिला ॥९॥
दिली आठवण शल्य नृपाला अपुल्या वचनाची
"मला रे स्मृती असे त्याची
करीन तेजोवध कर्णाचा" शल्य वदे त्याला ॥१०॥
शस्त्रांची सामुग्री वाटे अपुरी धर्मासी
वंदने यास्तव ज्येष्ठांसी
आशीषांचे कवच घालुनी युधिष्ठिर परतला ॥११॥